नृसिंहवाडीतील कृष्णेचे पाणी बनले हिरवट
By Admin | Updated: October 16, 2015 00:37 IST2015-10-16T00:33:42+5:302015-10-16T00:37:11+5:30
प्रदूषणाचा प्रश्न गंभीर : वेळीच उपाय योजण्याची भाविकांची मागणी

नृसिंहवाडीतील कृष्णेचे पाणी बनले हिरवट
नृसिंहवाडी : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीपात्रात पाणी हिरवट झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रदूषणामुळे भाविक नाराज होत आहेत.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दत्तक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले नृसिंहवाडी या ठिकाणी अनेक भाविक दररोज मोठ्या संख्येने कृष्णा-पंचगंगा नदीत स्नान करतात. त्यानंतर श्री दत्त दर्शनासाठी जातात. यंदा पावसाने दडी मारल्याने दरवर्षीप्रमाणे येथील कृष्णा-पंचगंगा नद्या दुथडी भरून वाहिल्याच नाहीत. त्यामुळे पाणी साचून राहिल्याने या वर्षी आॅक्टोबर महिन्यापासूनच जलप्रदूषणाला सुरुवात झाली आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून नदीचे पाणी अतिशय संथ गतीने पुढे जात आहे. नृसिंहवाडी गावातून येणारे पाणी थेट नदीत मिसळत आहे. शिवाय गुरुवारी सकाळपासून नदीतील पाणी हिरवट झाले आहे.
पाण्याला जास्त प्रवाह नसल्याने ते पाणी दत्त मंदिर परिसरात साचून राहिले आहे. या पाण्याला एक प्रकारचा वास येत आहे. हे पाणी असेच साचून राहिले तर यात्रेकरू व ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत पर्वकाळ आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी यांच्या बैठका सुरू आहेत. कृष्णा-पंचगंगा नदीत थेट मिसळणाऱ्या सांडपाणी व जलप्रदूषणाबाबत योग्य ती उपाययोजना आतापासून सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.