कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत बारा फुटांनी वाढ
By Admin | Updated: July 11, 2016 01:21 IST2016-07-11T01:21:29+5:302016-07-11T01:21:29+5:30
बळिराजा सुखावला : जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; संगम मंदिर निम्मे पाण्यात; अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; घरांचेही नुकसान

कृष्णा, पंचगंगेच्या पातळीत बारा फुटांनी वाढ
कोल्हापूर : आठवडाभर विश्रांती घेतलेल्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गेले दोन दिवस पावसाने धुवा उडविला. त्यामुळे चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.
वाडीतील संगम मंदिर पाण्याखाली
नृसिंहवाडी : सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या पाणी पातळीत गेल्या चोवीस तासांत तब्बल बारा फुटाने वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने कृष्णा-पंचगंगा संगमावरील संगम मंदिर निम्म्याहून अधिक पाण्याखाली गेले आहे, तर नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिराजवळ कृष्णा नदीचे पाणी आले आहे. दरम्यान, कृष्णा नदीचे पाणी वाढत असल्याने दत्त देव संस्थानचे कर्मचारी राहुल आगरे, सूरज जाधव, दत्तात्रय शिंदे, संतोष शिंदे, मिलिंद टोपकर आदींनी मंदिर परिसरातील नदीकाठचे साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे काम सुरू केले आहे.
आंबा घाट वाहतूकीस सुरक्षित
आंबा : मानोली, कांडवण, पालेश्वर, कासार्डे ही लघुबंधारे पूर्ण क्षमतेने भरली असून, पाटणे, सौते, सावर्डे, शिरगाव, कोपार्डे, येलूर, भोसलेवाडी, वालूर, सुतारवाडी, येळाणे, कोळगाव, टेकोली या गावांचा बंधारे पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला. आंबा, पावनखिंड, विशाळगड या भागात वाऱ्याचाही जोर कायम आहे. वादळ व पूरस्थितीमुळे पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबाघाट मात्र वाहतुकीस सुरळीत राहिला.
दिगवडे, पुनाळ धरणे पाण्याखाली
कोतोली : पन्हाळ पश्चिम भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे बोरगाव-पोहाळे, मुगडेवाडी, किसरूळ, आळवे, कसबा ठाणे, दिगवडे, पुनाळ, आदी धरणे पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प झाली आहे. संततधार पावसामुळे शेतीच्या कामांना गती आली असून, भात रोप लागणी, नाचना लावणी, चिखल कोळपणी,आदी कामांना गती आली आहे.
वारणा कापशीत संततधार
वारणा कापशी : वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने नदीकाठावरील शेतात पाणीच पाणी झाले आहे, तर माणगाव-हारुगडेवाडी येथील ओढ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक रविवारी दुपारपासून बंद होती. भेडसगावमार्गे मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स शिराळामार्गे वळविल्या.
राशिवडे परिसरात जोर कायम
राशिवडे : परिसरात रविवारी पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे भोगावती नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदी दुथडी तर ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देणारा
पाऊस असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
हातकणंगलेत ५१ मि.मी. पाऊस
हातकणंगले : तालुक्यात शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून रविवारी सकाळी आठपर्यंत ५१ मि.मी.पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. तालुक्यातील ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारपासून पडणाऱ्या पावसामुळे गावागावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागल्यामुळे ग्रामीण भागातील विहिरींना पाझर फुटला आहे. गावतळ्यामध्ये पाणी आल्याने शेतकरी, ग्रामस्थ सुखावले आहेत. रविवारी दिवसभर रिपरिप सुरूच होती. रविवारी सकाळी आठपर्यंत तालुक्यात ३२७ मि.मी. पाऊस झाला आहे.
कोडोली परिसरात संततधार
कोडोली : कोडोलीसह परिसरात सलग दोन दिवस दिवसरात्र जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. अमृतनगर-चिकुर्डे या रस्त्यावरील बंधारा पाण्याखाली गेला आहे, तर कोडोली-मांगले या रस्त्यावरील पुलावर रविवारी सकाळी पाणी आले आहे. माले येथे असलेला तलाव पूर्णक्षमतेने भरला असून, रविवारी सकाळपासूनच सांडव्यातून पाणी बाहेर पडत आहे. मलकापूर- वठार तसेच परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक तुरळक प्रमाणात सुरू होती.
वारणा, कडवीचे पाणी पात्राबाहेर
सरूड : सरूड (ता. शाहूवाडी) परिसरातील रस्ते पाणीमय झाले आहेत. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.
शित्तूर वारुण परिसराला झोडपले
शित्तूर वारुण : शित्तूर वारुण आणि परिसराला सलग दोन दिवस पावसाने अक्षरश: झोडपून काढले. जोराचा वारा आणि दमदार पावसामुळे शनिवारपासून या परिसरामध्ये विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. जोरदार पावसामुळे या परिसरातील रोप लावण्याच्या कामांना वेग आला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
वाघापूर धरण पाण्याखाली
वाघापूर : परिसरातील गावांत पडणाऱ्या धुवाधार पावसाने बळिराजा सुखावला आहे. परिसरातील गावांतील ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. वाढत्या पावसामुळे पाणी वेदगंगा पात्राबाहेर पडले
असून, वाघापूर, गंगापूर धरण पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे रविवारी ज्योतिर्लिंग देवालयाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना
मुरगूड, मडिलगेमार्गे वाघापूरला यावे लागले.
जयसिंगपूर बसस्थानकात तळे
जयसिंगपूर : शनिवारी झालेल्या पावसाने जयसिंगपूर बसस्थानकात तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. बसस्थानकाच्या परिसरात सखल भाग असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उदगावमध्ये गटारी धोकादायक
जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील साखळे मळ्यातील गटारींमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. गटारीवर रस्ता नसल्यामुळे रात्रीच्यावेळी नागरिक गटारीत पडत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीकडे मागणी करूनही दुर्लक्ष केल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पोहाळे परिसरात तारांबळ
पोहाळे तर्फ आळते : पोहाळे, कुशिरे, निगवे, गिरोली परिसरात रविवारी दिवसभर धुवाधार पाऊस झाला. यामुळे शेतातील कामे ठप्प झाली. तसेच डोंगर परिसरातील ओढ्या-नाल्यांतून पाणी वाहू लागले. त्यामुळे शेतकरी वर्ग रविवारी घरीच होता. पिकाच्या वाढीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. पोहाळे, कुशिरे, निगवे परिसरात लग्नकार्य असल्याने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली.
म्हासुर्ली बंधाऱ्यात पाणी
म्हासुर्ली : म्हासुर्लीसह संपूर्ण धामणी खोऱ्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून, धामणी नदीचे पाणी पात्राबाहेर आले. रविवारी दिवसभर या परिसरात संततधार पाऊस सुरू असून, परिसरातील ओढे-नाले पात्राबाहेर आले आहेत.
रुकडी परिसरात ओढे भरले
रुकडी : रुकडी (ता. हातकणंगले) परिसरात पावसाने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. रुकडी परिसरातील अतिग्रे, चोकाक, माले, मुडशिंगी, हेरले परिसरात ओढे, नाल्यांतून पाणी वाहू लागले,
तर ओढ्यावर बांधलेले सिमेंट
बंधारे पूर्णपणे भरली आहेत. (वार्ताहर)
गगनबावडा : बंधाऱ्यांवरील पाण्यामुळे वाहतूक ठप्प
साळवण : मुसळधार पावसामुळे गगनबावडा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून, कुंभी व सरस्वती नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. वेतवडे, मांडुकली, शेणवडे, अणदूरदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे दोन्ही बाजंूची वाहतूक ठप्प झाली आहे. वाहतुकीसाठी नदीपलीकडील गावांतील नागरिक मार्गेवाडी-मणदूर दरम्यान झालेल्या नव्या पुलाचा वापर करीत आहेत. कुंभी मध्यम प्रकल्प धरण क्षेत्रावर रविवारी विक्रमी १८0 मि.मी. नोंद झाली. गेल्या दोन दिवसांत तब्बल २३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणात ४३.८८ द.ल.घ.मी. पाणीसाठा झाला असून, पातळी ६0३.८५ झाली आहे. आजअखेर धरण ५७ टक्के भरले आहे. कोदे व वेसरफ ही पूर्णक्षमतेने भरली आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा
कोल्हापूर : पावसाने दाणादाण उडविल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी तहसीलदारांकडून आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांनी योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या.
डॉ. सैनी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून जिल्ह्णातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व तहसीलदारांशी संपर्क साधून पूरबाधित गावांचा आढावा घेतला. पुराचा धोका उद्भवल्यास या गावातील लोकांना कुठे स्थलांतरित करणार याविषयीही चर्चा केली.
कागल शहरात ९२ मि.मी. पाऊस
कागल : कागल शहर आणि परिसरात रविवारी दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. येथील दूधगंगा नदीचे पाणी रविवारी सकाळी पात्राबाहेर पडले. पंधरा दिवसांपूर्वीच पाण्याअभावी तळ गाठलेल्या दूधगंगा नदीचे पाणी पात्र भरून वाहू लागले आहे.
संततधार पावसामुळे शेतामध्ये पाणी साचले आहे. दोन दिवसांच्या या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. ओढे-नालेही दुथडी भरून वाहू लागले आहेत. कागल परिसरातील तलावांच्या पाण्याची पातळीही वाढू लागली आहे. तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
आजऱ्यात अतिवृष्टी
आजरा : आजरा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली असून तालुक्यातील साळगावसह प्रमुख बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चंदगड व देवकांडगाव मार्गावरची वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेले दोन दिवस आजरा तालुक्यात तुफानी पाऊस सुरू आहे. आजरा येथे तब्बल १०३ मि. मी., गवसे येथे ११० मि. मी., मलिग्रे येथे ९३ मि.मी, तर उत्तूर येथे ६० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे हिरण्यकेशी व चित्री नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे.
वेदगंगेचे पाणी पात्राबाहेर, तीन बंधारे पाण्याखाली
मुरगूड : सर पिराजीराव तलावातील पाणीसाठ्यात तब्बल १६ फुटांनी वाढ झाली आहे. रविवारी दुपारपर्यंत पाणी पातळी २५ फुटांवर होती. याशिवाय वेदगंगेच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.
मुरगूड-कुरणीदरम्यानच्या बंधाऱ्यासह सुरुपली, बस्तवडे बंधाऱ्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे कुरणी, मळगे, भडगाव, सावर्डे, चौंडाळ गावांतील लोकांना मुरगूडला निढोरीमार्गे वळसा घालून यावे लागत आहे.
वेदगंगा नदीपात्रात सर्वत्रच शनिवारपासून दमदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने नदीमधील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. रविवारी सकाळी वेदगंगेचे पाणी यावर्षी प्रथमच पात्राबाहेर पडले असून मुरगूड-कुरणी, सुरुपली-मळगे व बस्तवडे-आणूरदरम्यान असणाऱ्या बंधाऱ्यावर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. अवचितवाडी येथील उपराळा तलावामध्ये कमालीचा पाणीसाठा झाला आहे.
‘कळंबा’ ५० टक्क्यांवर
कळंबा : कळंबा व लगतच्या उपनगरांत शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. उपनगरांतील हमरस्ते पाण्याखाली व नागरी