‘कृष्णा’च्या बाजारात आश्वासनांची खैरात
By Admin | Updated: June 3, 2015 01:01 IST2015-06-03T00:10:54+5:302015-06-03T01:01:26+5:30
फुकट साखर, उच्चांकी दर : ‘अशक्य ते सर्व’ देण्याचे आश्वासन

‘कृष्णा’च्या बाजारात आश्वासनांची खैरात
अशोक पाटील -इस्लामपूर -विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते आणि डॉ. सुरेश भोसले यांनी निवडणुकीच्या निमित्ताने ‘कृष्णा’चा बाजार मांडला आहे. या बाजारात डॉ. सुरेश भोसले यांनी आम्हाला निवडून द्या, फुकट साखर देतो, असे सभासदांना आश्वासन देण्यास सुरुवात केली आहे. उच्चांकी दरासह अशक्य असणारी अनेक आश्वासने तिन्ही पॅनेलप्रमुखांकडून दिली जात आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने सभासदांवर आश्वासनांची खैरात सुरू आहे.
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचे धूमशान गेल्या दोन महिन्यांपासून रंगले आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलच्या माध्यमातून प्रचार शिगेला नेला आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते हे कारखाना कसा तोट्यात आणला, याचा पाढा प्रचार दौऱ्यातून वाचत आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात त्यांच्या किमान दोन ते तीन सभा झाल्या आहेत. असाच प्रकार सहकार पॅनेलप्रमुख व संस्थापक पॅनेलप्रमुखांचा आहे. जेथे मोहिते यांनी सभा घेतल्या आहेत, तेथे डॉ. भोसले व विद्यमान अध्यक्ष मोहिते यांनीही सभा घेतल्या आहेत. या सभामंधून तिन्ही पॅनेलप्रमुखांनी सभासदांवर आश्वासनांची खैरात केली आहे. सभासद हे ऐकून ऐकून वैतागले असून, पदरात पडेल त्यावेळीच खरे, असे म्हणत कोणाला मतदान करायचे, या संभ्रमात आहेत.
रयत पॅनेलकडून माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते आणि मदन मोहिते सभासदांना वेगवेगळी आश्वासने देण्यात आघाडीवर आहेत, तर सहकार पॅनेलचे डॉ. सुरेश भोसले आणि डॉ. अतुल भोसले वेगवेगळ्या भूमिका सभासदांसमोर मांडत आहेत. या दोन पॅनेलमध्येच मोठी चुरस असल्याची चर्चा आहे. विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते ‘एकला चलो रे’चा नारा देत दोघांना शह देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच तिन्ही पॅनेलच्या प्रचाराचा प्रारंभ मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आला. यावेळी तिन्ही गटाच्या प्रमुखांनी सभासदांवर आश्वासनांची खैरात केली. मोफत साखर, उच्चांकी दर, नोकरीत कायम करणे अशी आश्वासने दिली आहेत. ही आश्वासने निवडणूक झाली की सर्व नेते विसरून जातात. तसा अनुभव प्रत्येक निवडणुकीत सभासदांना आला आहे. त्यामुळे यावेळच्या आश्वासनानंतर नेमके किती पदरात पडणार, याची चर्चा सभासदांतून आहे.