संदीप बावचे -- जयसिंगपूर -पंचगंगापाठोपाठ कृष्णा नदीही दूषित बनली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात साथीचे आजार फैलावत आहेत. चिकुनगुन्यासदृश साथीचा फैलाव झाला आहे. यामुळे पंचगंगा नदी शिरोळ तालुक्यासाठी आणखी शाप ठरत आहे.कोल्हापूर, इचलकरंजी शहरातील मैलामिश्रित पाणी, औद्योगिक सांडपाणी थेट पंचगंगा नदी पात्रात मिसळत असल्याने हे दूषित पाणी तेरवाड बंधाऱ्यातून खाली सोडण्यात येते. पुढे नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत हे दूषित पाणी मिसळते. पावसाळ्यानंतर कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद केले जातात. त्याचा परिणाम शिरोळ तालुक्यावर दिसून येतो. आॅक्टोबरनंतर शिरोळ तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नदीची पाणीपातळी कमी झाल्याने धरणातून पाणी सोडण्यात येते. याचा फायदा नदी प्रदूषित करणारे घटक उचलतात. नव्याने पाणी सोडण्यात आल्यानंतर प्रदूषित पाणी वाहत्या पाण्यात सोडण्यात येते. यामुळे पंचगंगा, कृष्णा नदीपात्रातील मासे मृत पावत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. हिप्परगी धरणाच्या बॅक वॉटरमुळे प्रदूषित पाणी पुढे प्रवाहित होत नसल्याने याचा परिणाम शिरोळ तालुक्यात सध्या जाणवत आहे. दूषित पाणी पुढे प्रवाहित न झाल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीवर अवलंबून असणाऱ्या सुमारे ४० हून अधिक गावांना त्याचा फटका प्रत्येक वर्षी बसतो. सध्या जवळपास चारही नदी पात्रात दूषित पाणी दाखल झाले आहे. हेच दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील प्रत्येक गावात साथीचे आजार वाढले आहेत. चिकुनगुन्यासदृश तापाची लागण झाली आहे. सर्व शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. औषधोपचारासह पाणी दूषित असल्याने पाणी गरम करून प्यावे, असा सल्ला वैद्यकीय अधिकारी देऊ लागले आहेत. या दूषित पाण्याचा विळखा कधी थांबणार हाच यक्षप्रश्न शिरोळ तालुक्यातील जनतेसमोर आ वासून उभा आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत नसलेली ठोस कारवाई, निवडणुकीपुरतीच नेत्यांची आश्वासने अशा अनेक चक्रात पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न रेंगाळतच पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयात पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर न्यायालयीन लढा सुरू आहे, तो कधी संपणार असाही प्रश्न आजमितीला कायम आहे. (उत्तरार्ध)‘शिरोळ’ला शिक्षा काळ्या पाण्याची ! प्रदूषणात भरदुष्काळसदृश परिस्थितीमुळे यंदा नदी पात्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशाने धरणातूनही कमी प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी शेतीला पाणी कमी प्रमाणात मिळणार आहे. दरम्यान, लवकरच शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदी पात्रात वाळू प्लॉटचे लिलाव होणार आहेत. मात्र, नदी पात्रात कमी पाणी असल्यामुळे यांत्रिकी बोटीने वाळू उपसा सुरू झाल्यास तेलाचा तवंग पाण्यावर पसरून दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.
कृष्णा, पंचगंगा शाप की वरदान ?
By admin | Updated: November 18, 2015 00:11 IST