राज्य बँकेसाठी ‘के.पीं.’ची फिल्डिंग

By Admin | Updated: June 3, 2015 01:06 IST2015-06-03T00:26:49+5:302015-06-03T01:06:02+5:30

विभागातून दोन प्रतिनिधींना संधी

KPP fielding for State Bank | राज्य बँकेसाठी ‘के.पीं.’ची फिल्डिंग

राज्य बँकेसाठी ‘के.पीं.’ची फिल्डिंग

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेवर संचालक म्हणून जाण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे संचालक के. पी. पाटील यांनी फिल्डिंग लावली आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांतून दोन प्रतिनिधी निवडले जाणार असून, यापैकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव निश्चित आहे. उर्वरित एक जागा चार जिल्ह्यांतून निवडली जाणार आहे. पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष लागले आहे.
राज्य सहकारी बॅँकेवर जिल्हा बॅँकेचे प्रतिनिधी असतात. पूर्वी राज्य बॅँकेच्या संचालक मंडळाची संख्या तब्बल ५४ होती; पण ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संचालकांच्या संख्येवर मर्यादा आली आहे. आता राज्य बॅँक संचालकांची संख्या २१ करण्यात आली आहे. राज्य बॅँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. राज्य बॅँकेच्या मतदार यादीत जिल्हा बॅँक व अर्बन बॅँक प्रतिनिधी म्हणून कोणाला पाठवायचे, याबाबत शनिवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्हा बॅँकेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे जिल्हा बॅँक गटातून के. पी. पाटील यांच्या नावाचा ठराव, तर अर्र्बन बॅँक गटातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नावाचा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आला. पुणे विभागातून केवळ दोन प्रतिनिधी संचालक मंडळात घेतले जाणार आहेत. पुणे जिल्हा बॅँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे नाव निश्चित मानले जात आहे. उर्वरित एका जागेसाठी कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्हा बॅँकेपैकी एकाला संधी मिळणार आहे. यासाठी के. पी. पाटील यांनी ताकद लावली आहे. दुसऱ्या प्रतिनिधीला संधी देताना राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. ( प्रतिनिधी )

Web Title: KPP fielding for State Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.