‘के.पी.' घरी, आबिटकरच ‘लय भारी’

By Admin | Updated: October 20, 2014 00:41 IST2014-10-19T23:53:21+5:302014-10-20T00:41:52+5:30

विद्यमान आमदार व राष्ट्रवादीचे उमेदवार के. पी. पाटील यांना मतदारांनी पराभवाचा मोठा धक्का

'K.P.' At home, with the title 'rhythm heavy' | ‘के.पी.' घरी, आबिटकरच ‘लय भारी’

‘के.पी.' घरी, आबिटकरच ‘लय भारी’

शिवाजी सावंत - गारगोटी -राधानगरी, भुदरगड, आजरा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीने झालेल्या दुरंगी लढतीत शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांनी ३९,४०८ मताधिक्याने एकतर्फी विजय मिळविला, तर विद्यमान आमदार व राष्ट्रवादीचे उमेदवार के. पी. पाटील यांना मतदारांनी पराभवाचा मोठा धक्का दिला. स्वाभिमानीचे प्रा. जालंदर पाटील यांच्यासह उर्वरित सहा उमेदवारांची अनामत जप्त झाली.
मौनी विद्यापीठाच्या तालुका क्रीडा संकुल केंद्रात सकाळी आठ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. प्रारंभी टपाली मतमोजणीस सुरुवात झाली. टपाली मतदानात प्रकाश आबिटकर यांना ८७५, तर के. पी. पाटील यांना ६९५ मते मिळाली. टपाली मतातच प्रकाश आबिटकर यांनी १८० मतांची आघाडी घेतली. टपाली मतदान ३,८४१ होते. त्यापैकी १,६१३ मतदारांनी मतदान केले. यामध्ये सैनिकांच्या १,८१७ मतांपैकी केवळ ०४ सैनिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदारसंघातील ३९६ केंद्रांची २९ फेऱ्यांमध्ये १४ टेबलांवर मोजणी झाली. पहिल्या फेरीचा निकाल सकाळी नऊ वाजता जाहीर झाला. यामध्ये प्रकाश आबिटकर यांनी २,६५२ मतांची आघाडी घेतली. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या फेरीत आबिटकर आघाडी घेत होते. पाचव्या फेरीच्या निकालात के. पी. पाटील यांना केवळ ५९ मतांची आघाडी मिळाली. पाचवी फेरी वगळता २९ फेऱ्यांमध्ये प्रकाश आबिटकर यांनी सतत आघाडी घेतली.
सकाळी अकराच्या सुमारास प्रकाश आबिटकर यांची विजयाकडे सुरू असलेली घोडदौड लक्षात येताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आणि गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष सुरू केला.
राधानगरी तालुक्यातील मतमोजणी पहिल्या १४ फेरीत पूर्ण झाली. यामध्ये १ लाख २० हजार २२८ मतांची मोजणी पूर्ण झाली. यामध्ये २१ हजार २८६ इतक्या मतांची निर्णायक आघाडी आबिटकर यांनी घेतली, तर भुदरगडने १५ हजार ४९९ मतांची आघाडी दिली, तर आजरा तालुक्याने २ हजार ६२३ मतांची आघाडी दिली. मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील आघाडी पाहता निवडणूक एकतर्फी झाली आहे.प्रकाश आबिटकरांच्या विजयानंतर मतमोजणी केंद्राजवळ भुदरगडसह राधानगरी, आजरा तालुक्यांतील हजारो कार्यकर्त्यांनी प्रकाश आबिटकरांची मिरवणूक काढली. फटाक्यांची प्रचंड आतषबाजी व गुलालाच्या उधळणीने संपूर्ण गारगोटी शहर भगवेमय झाल्याचे दिसत होते.मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्रीय निरीक्षक अलोककुमार, श्रीनिवास यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलवडे, भुदरगडच्या तहसीलदार शिल्पा ओसवाल, राधानगरीचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले, तर पोलीस निरीक्षक बन्सी बारकर व अनिल गाडे, उपनिरीक्षक विष्णू गायकवाड, राजेश राठोड, श्रीकांत पाटील यांच्यासह राखीव पोलीस दल, गुजरात, हैदराबाद व रेल्वे पोलीस यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर केंद्रीय निरीक्षक अलोककुमार श्रीवास्तव व निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांच्या हस्ते विजयी उमेदवार प्रकाश आबिटकर यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ‘बिद्री’चे संचालक विजयसिंह मोरे, मधुकर देसाई, सत्यजित जाधव, शिवाजीराव ढेंगे, अंकुश चव्हाण, धनाजी खोत, सयाजी देसाई, सर्जेराव मोरे, कल्याणराव निकम, प्रवीणसिंह सावंत, सुनील जठार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भुदरगड - राधानगरी-आजरा तालुका विधानसभा मतदारसंघातून प्रकाश आबिटकर यांच्या बाजूने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कौल दिसू लागताच आजऱ्यात प्रचंड जल्लोष सुरू झाला. हळूहळू संपूर्ण तरुणाई रस्त्यावर आली. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. अनेकांनी थेट गारगोटी गाठले. आबिटकरांच्या विजयाची घोषणाबाजी करीत तरुणांनी दुचाकीची रॅली काढली. अण्णा-भाऊ गटाचे कार्यकर्ते, शिवसेनेचे कार्यकर्ते, आजरा ग्रामपंचायतीचे सदस्य, मुस्लिम बांधव यांनी जल्लोष सुरू केला.

केवळ पाचव्या फेरीत के.पीं.ना आघाडी
मतदारसंघाची मतमोजणी २९ फेऱ्यांमध्ये पूर्ण झाली. त्यापैकी केवळ एका पाचव्या फेरीत अवघ्या ५९ मतांची आघाडी के. पी. यांना मिळाली. या फेरीत के. पीं.ना २९४३, तर आबिटकरांना २८६४ मते मिळाली, तर २७२ गावांपैकी केवळ पाच ते सात छोटी-छोटी गावे वगळता कोठेही मताधिक्य घेता आले नाही.
कामगाराचा मुलगा यशस्वी
या निवडणुकीत कारखानदार विरोधात कामगारांचा मुलगा अशा झालेल्या काटाजोड लढतीत प्रकाश आबिटकरांच्या रूपाने बिद्री कारखान्याच्या कामगाराचा मुलगा यशस्वी झाला, याची चर्चा जोरात सुरू होती.

गारगोटी भगवेमय
मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमत:च शिवसेनेने भगवा झेंडा रोवला आहे. डाव्या विचारांच्या या मतदारसंघावर कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना शिवसेनेने बाजी मारली.

१८१७ सैनिकांपैकी केवळ चौघांनी केले मतदान
राधानगरी-भुदरगड ंमतदारसंघात देशासाठी लढणाऱ्या सैनिक मतदारांची संख्या १ हजार ८१७ इतकी आहे. मात्र, यापैकी केवळ चार सैनिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित १८१३ सैनिक मतदार लोकशाहीचे संरक्षण करण्यामध्ये कमी पडले आहेत. सीमेचे रक्षण करणारे सैनिक लोकशाही भक्कम करण्यासाठी का लढले नाहीत? असा सवाल या उपस्थित होत आहे.

फेरमतमोजणीची काँग्रेसची मागणी फेटाळली
सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी शैलेंद्र सूर्यवंशी यांनी चंद्रदीप नरके यांना विजयी घोषित केल्यानंतर कॉँग्रेसच्या मतमोजणी प्रतिनिधींनी मतमोजणी केंद्र सोडले. त्यानंतर अर्धा तासाने बाळासाहेब खाडे, अ‍ॅड. प्रकाश देसाई यांनी फेरमतमोजणीची मागणी केली, पण ती सूर्यवंशी यांनी फेटाळून लावली.

‘धनशक्ती’च्या विरोधात ‘जनशक्ती’चा विजय
माझा विजय हा धनशक्तीच्या विरोधातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. सत्ताधाऱ्यांची फौज असताना माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला जनतेने नोट आणि व्होट देऊन विजयी केले आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासास पात्र राहून येथून पुढे काम करीन. राधानगरी-भुदरगड मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करून खऱ्या अर्थाने लोकाभिमुख विकासकामे करण्यासाठी सदैव प्रयत्न करीन. माझ्यासाठी असंख्य तरुणांनी दिलेले योगदान आणि आबालवृद्धांचा आशीर्वाद हेच माझ्या यशाचे गमक आहे.
- प्रकाश आबिटकर, शिवसेना

जनतेचा कौल मान्य
जनतेने दिलेला कौल मला मान्य असून, लोकशाहीत जय-पराजय होतच असतो. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव अशी विकासकामे केली. बेरोजगार तरुण, महिलांसाठी रोजगार उपलब्ध करुन दिला. बिद्री कारखान्याच्या माध्यमातून उसाला विक्रमी दरही दिला. मात्र, जनतेने दिलेला कौल मान्य करुन यापुढेही यापेक्षा चांगले काम करण्यासाठी आग्रही राहणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करणार आहे.
- के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस

शेतकऱ्यांसाठी लढणार
मतदारांनी विचाराच्या लढ्याऐवजी आमदार के. पी. पाटील यांच्या पराभवाचा चंग बांधला होता. त्यामुळे स्वाभिमानी पक्षाच्या मतात घट झाली. मी सत्तेसाठी निवडणूक लढविली नसून पक्ष आणि विचारांसाठी लढलो. त्यामुळे यापुढेही ऊसदरापासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपला लढा कायम राहील. सर्व स्वाभिमानी जनतेला बरोबर घेऊन यापुढेही आपण काम करीत राहू.
- प्रा. जालंधर पाटील, स्वाभिमानी



सर्व पक्षांचे जिल्हाध्यक्ष पराभूत
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, भाजपचे के. एस. चौगले, स्वाभिमानीचे प्रा. जालंधर पाटील यो सर्व पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले.

Web Title: 'K.P.' At home, with the title 'rhythm heavy'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.