पोलिसांकरिता शिवाजी विद्यापीठात कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:31+5:302021-04-27T04:26:31+5:30
कोल्हापूर : पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी सोमवारपासून शिवाजी विद्यापीठ येथे १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले ...

पोलिसांकरिता शिवाजी विद्यापीठात कोविड सेंटर
कोल्हापूर : पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसाठी सोमवारपासून शिवाजी विद्यापीठ येथे १०० बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये २० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी विशेष प्रयत्न करून हे कोविड सेंटर सुरू केले.
या कोविड सेंटरमध्ये ग्रामीण भागातून कोरोनाबाधित अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती यांना आणण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केलेली आहे. रुग्णांसाठी लागणारी औषधे, पौष्टिक आहाराचीही सोय करण्यात आली आहे. कोविड सेंटरमध्ये सर्व सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. दैनंदिन लक्ष देण्यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना तात्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. कोरोनाबाधित पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची प्रकृती बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार उपलब्ध होण्यासाठी खास व्यवस्था केली आहे.
तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रत्येक पोलीस अधिकारी व अमलदार यांना १०० एम. एल.च्या हँड सॅनिटायझर बॉटल्स दिल्या असून, एन -९५ चे मास्क, फेस शिल्ड पुरविले आहेत.