कोतोलीत महावितरणचा अंधाधुंद कारभार
By Admin | Updated: February 23, 2015 00:15 IST2015-02-22T23:53:33+5:302015-02-23T00:15:34+5:30
शेतकऱ्यांच्या जीवितास धोका : शेतीपंपाच्या डिपीला सरळ जोडणी

कोतोलीत महावितरणचा अंधाधुंद कारभार
किरण मस्कर - कोतोली (ता. पन्हाळा) येथील महावितरण वीज कंपनीचा अंधाधुंद कारभार होत असून, या प्रकारामुळे कोलोली परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
कोतोलीपासून ५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या कोलोली-तिरपण हद्दीच्या ठिकाणी नदीच्या काठाला शेतीपंपाला दिली जाणारी ४२० व्होल्ट डीपी बसविण्यात आली आहे; पण डीपीची पेटी नेहमीच उघडी असून पेटीमध्ये एकूण सुमारे १२ फ्यूज कनेक्शन आहेत; पण यातील दोन फ्यूज चांगल्या आहेत, तर राहिलेल्या फ्यूजची सरळ जोडणी करून जोडण्यात आल्या आहेत.
कार्यालयामधून पाच किलोमीटर अंतर असल्याने वीज खंडित झाल्यास वायरमन वेळेत येऊ शकत नाही. उलट मी बाहेर आहे, आॅफिसला कळवा, असे सांगत आहेत. त्यामुळे शेतामध्ये वैतागलेला शेतकरी वीज खंडित झाल्यास स्वत: जाऊन फ्यूज घालणे असा प्रकार करीत आहेत; पण पेटीत फ्यूजच नसल्याचे व सरळ जोडणी असल्याने शेतकऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
परिसरात अशा अनेक शेतीच्या ठिकाणी असणाऱ्या डीपीच्या पेट्या उघड्या आहेत. त्यांना साध्या फ्यूजही जोडल्या गेल्या नाहीत. तरी त्वरित परस्परातील सर्व शेतीपंपाच्या डीपीच्या फ्यूज बसवून
शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी व वरिष्ठांची अरेरावी
बरेचवेळा कर्मचारी व वरिष्ठ इंजिनिअर्स यांच्याकडे आम्ही फ्यूज बसविण्याची मागणी केली; पण कर्मचारी व वरिष्ठ हे नेहमीच अरेरावीची भाषा वापरत आहेत. वीज खंडित झाल्यास फोन लावल्यानंतर उचलत नाहीत. मी बाहेर आहे, असे सांगतात. आम्हालाच पाण्याची गरज आहे म्हणून आम्ही स्वत:च फ्यूज घालतो. - संजय जाधव, सुनील जाधव, शेतकरी.
फ्यूज उपलब्ध झाल्यास बसविणार
अनेकवेळा वरिष्ठ आॅफिसला नवीन फ्यूज मिळाव्यात म्हणून मागणी करण्यात आली आहे; पण अद्याप फ्यूज आल्याच नाहीत. फ्यूज उपलब्ध झाल्यसा ताबडतोब बसविल्या जातील.
- उर्वी पिंगळे, ज्यु. इंजिनिअर्स,
कोतोली विभाग