कोथळीच्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By Admin | Updated: September 13, 2015 00:18 IST2015-09-13T00:18:43+5:302015-09-13T00:18:43+5:30
मोबाईल चार्जिंगला लावताना दुर्घटना

कोथळीच्या तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
जयसिंगपूर : मोबाईल चार्जिंगला लावताना विजेचा धक्का बसून कोथळी (ता. शिरोळ) येथील दीपक श्रीकांत मुदकान्ना (वय २५) हा तरुण ठार झाला. ही घटना
शुक्र वारी रात्री १०च्या दरम्यान घडली.
मार्केटिंगच्या कामानिमित्त दीपक मुदकान्ना हा गोव्याहून रात्री कोथळी येथील घरी परतला. मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी घरामागील जनावरांच्या गोट्यालगत असलेल्या खोलीतील सॉकेटमध्ये चार्जर घालताना त्याला विजेचा झटका बसला. पावसाच्या पाण्यामुळे जमीन ओली असल्यामुळे विजेचा दाब वाढून दीपक मुदकान्ना जमिनीवर कोसळला. घरातील लोकांनी आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी त्यांच्या घरातील विद्युत पुरवठा बंद करून त्याला तातडीने उपचारासाठी सांगली येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला. एम.बी.ए.पर्यंत शिक्षण घेतलेला दीपक जयसिंगपूर येथील औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या मार्केटिंगचे काम करीत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)