कोरे, आवाडेंची भूमिका ठरणार निर्णायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST2021-09-14T04:29:45+5:302021-09-14T04:29:45+5:30
राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व राहिले असले ...

कोरे, आवाडेंची भूमिका ठरणार निर्णायक
राजाराम लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर पालकमंत्री सतेज पाटील यांचे वर्चस्व राहिले असले तरी
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक अनिश्चितेच्या भोवऱ्यात सापडल्याने विधान परिषद निवडणुकीत मंत्री पाटील यांचा कस लागणार आहे. काँग्रेसच्या चिन्हावरील ५९ सदस्य आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी व शिवसेना राहणार असली तरी भाजपची व्यूव्हरचना पाहता, निवडणूक अटीतटीची होणार, हे निश्चित आहे. या निवडणुकीत आमदार विनय काेरे व प्रकाश आवाडे यांच्यासह स्थानिक आघाड्यांच्या भूमिकेलाही महत्त्व येणार आहे.
विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत मंत्री सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यात निकराची लढाई झाली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे ताकदीने मागे राहिल्याने पाटील यांनी बाजी मारली. गेल्या पाच वर्षांत नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायती, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सक्रिय झालेले विविध गट पाहता विधान परिषद निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र राहणार हे निश्चित आहे. मात्र, हक्काची पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले काँग्रेसचे ५९, राष्ट्रवादीचे ४१, शिवसेनेचे ३९ अशी महाविकास आघाडीची १३९ मते आहेत. भाजपच्या चिन्हावरील ७४ सदस्य आहेत. जनता दलाचे १३, तर जनसुराज्य पक्षाचे तब्बल २६ सदस्य आहेत. उर्वरित सदस्य स्थानिक आघाड्या व अपक्ष आहेत. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे २१ मते आहेत. त्याशिवाय स्वाभिमानी पक्ष, युवकक्रांती आघाडी आदी आघाड्यांकडे मते आहेत. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लांबणीवर गेल्याने हक्काची ४०-५० मतांची मदत यावेळेला मंत्री पाटील यांना होणार नाही. महापालिकेतील मताचे गणित गृहीत धरून मंत्री पाटील यांनी गेली तीन-चार महिने जोडण्या लावल्या आहेत. त्यांना महाविकास आघाडी व त्या संबंधित गटांची ताकदही त्यांना मिळणार आहे. मात्र, भाजपची व्यूव्हरचना पाहता येथे काट्याची टक्कर होणार, हे निश्चित आहे.
भाजपकडून शौमिका महाडिक, राहुल आवाडेंचे नाव
मंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात भाजप मित्र पक्षांकडून महादेवराव महाडिक यांच्या घरातच उमेदवारी ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यातून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील साटेलोट्याचे राजकारण पाहता ऐनवेळी राहुल आवाडे यांचे नाव पुढे येऊ शकते. हे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरू शकते.
पक्षनिहाय मतदार असे-
काँग्रेस - ५९
राष्ट्रवादी - ४१
शिवसेना- ३९
भाजप - ७४
जनसुराज्य- २६
जनता दल-१३
मनसे-२
या आघाड्यांच्या भूमिका ठरणार महत्त्वाच्या
युवक क्रांती (वडगाव) -१४
यादव पॅनल - ४
आजरा विकास आघाडी - ६
शाहू आघाडी (कारंडे, इचलकरंजी) -१०
ताराराणी (चाळके, मोरबाळे)- १२
जांभळे गट - ८
शाहू आघाडी (जयसिंगपूर)- १३
ताराराणी (भाजपप्रणीत) - १०
शिरोळ आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना) - ९