कोकण रेल्वेची ‘रो-रो’ सेवा फायदेशीर

By Admin | Updated: November 25, 2014 23:52 IST2014-11-25T23:31:35+5:302014-11-25T23:52:54+5:30

मालवाहतूक : दक्षिणेत जातानाचे १०० किलोमीटरचे अंतर व साडेचार हजारांची बचत

Konkan Railway's Ro-Ro service is beneficial | कोकण रेल्वेची ‘रो-रो’ सेवा फायदेशीर

कोकण रेल्वेची ‘रो-रो’ सेवा फायदेशीर

कोल्हापूर : केरळमध्ये मालवाहतुकीसाठी येणारा खर्च आणि वेळ यांची बचत करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक मालवाहतूकदारांनी कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे सहायक वाहतूक प्रबंधक एस. विनय कुमार यांनी केले. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुमार म्हणाले, केरळमध्ये मालवाहतूक करणारे ७५ टक्के ट्रक्स हे कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील आहेत, असे कोकण रेल्वेच्या पाहणीत दिसून आले आहे. त्यानुसार या तीन जिल्ह्यांतील मालवाहतुकीच्या ट्रक्सची वाहतूक कोकणातील नांदगाव तिठ्ठा येथील रेल्वेस्थानकावरून मालगाडीने करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यासाठी कोल्हापुरातून दररोज किमान ५० मालवाहतुकीचे ट्रक्स नांदगाव येथे येणे अपेक्षित आहे. कोल्हापूर आणि परिसरातून ५० ट्रक्स उपलब्ध झाल्यास रो-रो सेवा देण्यास आम्ही तत्पर आहोत.
कोकण रेल्वे १९९८ पासून मुंबईशेजारील कोलाड ते सुरत्कल या मार्गावर दर्जेदार रो-रो सेवा देत आहे. या मार्गावर दररोज चार मालगाड्यांची ये-जा होत असते. मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या एका मालगाडीतून एकावेळी ५४ ट्रक्स वाहून नेले जातात. रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत मालगाडी वाहतूक ही स्वस्त आणि कमी त्रासाची होते.
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, सध्या कोल्हापूर जिल्ह्यातून दररोज सुमारे १५० मालवाहतूक ट्रक्स दक्षिणेत जातात. कोल्हापूर ते मंगलोर अंतर सुमारे ६०० किलोमीटर आहे. मंगलोरपर्यंत जाण्यासाठी डिझेलला सुमारे ११ हजार रुपये खर्च येतो. तसेच या मार्गावर टोलसाठी एक हजार रुपये खर्च येतो. याशिवाय आरटीओ, चेकपोस्ट या समस्यांना सामोरे जावे लागते. याच मालवाहतुकीसाठी कोकण रेल्वेच्या रो-रो सेवेचा लाभ कोकणातील नांदगाव येथील रेल्वेस्थानकातून घेतल्यास दोन दिवसांचा प्रवास केवळ दहा तासांत पूर्ण होईल; तसेच १०० किलोमीटरचे अंतर वाचेल. यामुळे ट्रक मालवाहतूकदारांचे इंधन आणि इतर रूपांतील साडेचार हजार रुपये एका फेरीमागे वाचतील. चालकांनाही त्रास होणार नाही. कोकण रेल्वेच्या या प्रस्तावाबाबत आम्ही सकारात्मक विचार करू.
या पत्रकार परिषदेला कोकण रेल्वेचे सहायक वाणिज्य व्यवस्थापक गणेश सामंत, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष भाऊ घोगळे, सचिव हेमंत डिसले, खजानिस प्रकाश केसरकर, संचालक जगदीश सोेमय्या, विजय भोसले, सुरेश मिरजी तसेच असोसिएशनचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Konkan Railway's Ro-Ro service is beneficial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.