कोकण मंडळाने रचला इतिहास!
By Admin | Updated: April 1, 2016 01:41 IST2016-04-01T01:38:21+5:302016-04-01T01:41:41+5:30
नवा आदर्श : दहावी, बारावी परीक्षा गैरमार्गविरहीत

कोकण मंडळाने रचला इतिहास!
सागर पाटील --टेंभ्ये --महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कोकण मंडळाने नवा इतिहास रचला आहे. कोकण मंडळाच्या स्थापनेनंतर यावर्षीच्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये एकही गैरप्रकार आढळलेला नाही. दोन्ही जिल्ह्यांमध्ये मिळून १६ भरारी पथकांनी तपासणी केली. विभागातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळला नाही.
कोकण मंडळाने राज्यात सर्वाधिक निकालाच्या विक्रमाबरोबरच यावर्षी गैरमार्गविरहीत परीक्षा घेऊन राज्यात नवा आदर्श निर्माण केला आहे. गुणवत्तेबरोबरच काटेकोरपणे परीक्षा घेण्यात कोकण अव्वल असल्याचे यातून समोर आले आहे.
परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रत्येकी ७ भरारी पथके व विभागस्तरावरून २ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली होती. या पथकांच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यात मिळून ३८३ भेटी देण्यात आल्या. या भेटी दरम्यान विभागातील कोणत्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आलेला नाही.
कोकण मंडळाच्या स्थापनेपासून प्रथमच हा अशक्यप्राय टप्पा मंडळाने गाठला आहे. गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्यात राज्यात अव्वल ठरण्याचा बहुमान कोकण मंडळाला मिळाला आहे. कोकण मंडळाच्या इतिहासातील हा सुवर्ण क्षण असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
कोकण विभागातून मार्च २०१२मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत ६ गैरप्रकार आढळले होते. आॅक्टोबर २०१२मध्ये १ गैरप्रकार, मार्च २०१३मध्ये ३२ गैरप्रकार, आॅक्टोबर २०१३मध्ये ९ गैरप्रकार, मार्च २०१४मध्ये २५ गैरप्रकार, आॅक्टोबर २०१४मध्ये १९, तर मार्च २०१५मध्ये १९ व आॅगस्ट व आॅक्टोबर २०१५मध्ये १८ गैरप्रकार नोंदवण्यात आले आहेत. फेब्रुवारी - मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये यावर्षी प्रथमच गैरमार्गांचा अहवाल निरंक आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात केंद्र भेटी देऊन व कडक तपासणी केल्यानंतरदेखील एकही गैरप्रकार न आढळणे, ही बाब कोकण मंडळाच्या दृष्टीने भूषणावह आहे.
या महत्वपूर्ण यशाबद्दल मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, सचिव आर. बी. गिरी, सहसचिव किरण लोहार, सहाय्यक सचिव सी. एस. गावडे यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
आवाहन : मेळावे अन् विविध स्पर्धा...
गैरमार्गमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले होते. अध्यक्ष, सचिव यांच्या आकाशवाणीवरून विशेष मुलाखतींसह शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे मेळावे आयोजित करण्यात आले, कॉपीमुक्त परीक्षा अभियानांतर्गत पोस्टर स्पर्धा घेण्यात आली होती, मुख्याध्यापक व केंद्र संचालक यांची विशेष सभा घेऊन गैरमार्गमुक्त परीक्षा घेण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. पालकांशी संवाद साधून गैरप्रकाराचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले.