कागलमधील गणेशोत्सवाला विधायकतेचे ‘कोंदण’
By Admin | Updated: September 6, 2016 23:44 IST2016-09-06T21:46:42+5:302016-09-06T23:44:34+5:30
विधायकतेचा ‘यू’ टर्न : प्रबोधनाचीच ‘पायाभरणी’; गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यावरच मंडळांचा भर

कागलमधील गणेशोत्सवाला विधायकतेचे ‘कोंदण’
दत्तात्रय पाटील --म्हाकवे --राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या कागल तालुक्यातील गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यावरच येथील तरुण मंडळांचा भर आहे. सामाजिक सलोखा, समाजोपयोगी प्रबोधनात्मक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचीच तालुक्यातील अनेक मंडळामध्ये जणू रस्सीखेच सुरू आहे.
कागल व मुरगूड पोलिसांनी प्रत्येक गावातील तरुण
मंडळाच्या बैठका घेऊन चर्चा केल्या. यावेळी कोणकोणते विधायक कार्यक्रम राबवितो याची यादीच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी
पोलिसांना दिली. त्यामुळे तालुक्यातील गणेशोत्सवाला विधायकतेचे ‘कोंदण’ लाभल्याचे दिसत आहे. तालुक्यातील अनेक मंडळांनी रक्तदान, आरोग्य, नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजनही केले आहे.
राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या या तालुक्यात गट-तटाचे राजकारण आहे. त्यामुळे ईर्षेतून अनेक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु, मंडळामधील इर्षेने आता ‘विधायकतेचा यू टर्न’ घेतला आहे. जवळपास सर्वच गावांतील मंडळाच्या कार्यक्रम पत्रिका, नियोजन पाहिल्यानंतर बदलाचे वारे दिसून येत आहे.
दरम्यान, कागल तालुक्यात सांस्कृतिक पायाभरणी व्हावी या दृष्टीने ‘शाहू’ ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्यासह कागलचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी व मुरगूडचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनीही प्रत्येक गावातील मंडळाच्या त्या त्या ग्रामपंचायत कार्यालयात बैठका घेतल्या. विघातक डॉल्बीचे दुष्परिणाम आणि बेंजो, लेझीम, झांजपथक, आदी पारंपरिक वाद्य संगीताचा उपयोग याबाबत प्रबोधनही केले आहे.