सक्षमतेच्या दिशेने कोळी समाजाची वाटचाल
By Admin | Updated: August 2, 2015 23:36 IST2015-08-02T23:36:06+5:302015-08-02T23:36:06+5:30
स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापुरात : पारंपरिक व्यवसायासह अन्य क्षेत्रांत स्थिरावतोय समाज--कोळी समाज लोकमतसंगे जाणून घेऊ

सक्षमतेच्या दिशेने कोळी समाजाची वाटचाल
कोल्हापूर : महर्षी वाल्मीकी ऋषी, व्यास मुनी, भृशुंडी ऋषी, कर्ण राजा, तानाजी मालुसरे अशा संत, नरवीरांचा वारसा लाभलेला कोळी समाज शिक्षणाचा आधार घेऊन सक्षम होत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापुरात दाखल झालेला हा समाज आपली परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालून कार्यरत आहे.
या समाजातील अधिकतम बांधव पारंपरिक शेती, मासेमारी व्यवसाय व जोड व्यवसाय करीत असून, गेल्या काही वर्षांपासून समाजातील तरुणवर्ग हा पोलीस, संरक्षण दल, आदी क्षेत्रांकडे वळला आहे. यासह उच्च शिक्षण घेऊन संशोधक, इंजिनिअर, डॉक्टर, उद्योगपती, नोकरी, वकिली आणि शिक्षक अशा विविध क्षेत्रांत स्थिरावला आहे. महर्षी वाल्मीकी समाजाचे आराध्य दैवत असून, समाजाचे बहुतांश वास्तव्य ग्रामीण भागात अधिक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या करवीरनगरीच्या (कोल्हापूर) इतिहासाच्या आधारे येथे कोळी जमातीचे लोक राहत होते, हे दिसून येते. हा समाज फार प्राचीन काळापासून सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. याची साक्ष ‘रामायण’ रचयिते महर्षी वाल्मीकी ऋषी, ‘महाभारत’ रचयिते व्यास मुनी, श्री गणेशाचे पट्टशिष्य नामा कोळी ऊर्फ भृशुंडी ऋषी, स्वत:ची कवचकुंडले देणारा कर्ण राजा, गौतम बुद्ध यांची पत्नी यशोधराचे पिता कोळीय राजा दंडपाणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची युद्ध सहकारिणी झलकारिणीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू सहकारी तानाजी मालुसरे, विठ्ठलाचे भक्त पुंडलिक हे सर्व कोळी बांधव होते.
कोल्हापुरात ५० वर्षांपूर्वी शहरातील कोळी समाजबांधवांची संख्या कमी होती. मात्र, त्यानंतर शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहरातील संख्या वाढू लागली. जिल्ह्यात समाजबांधवांची एकूण संख्या सुमारे एक लाख आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त ग्रामीण भागातून ते दररोज शहरात येतात. काही कुटुंबांनी शहर व उपनगरांत कायमचे वास्तव्य केले आहे. ग्रामीण भागातील समाजाने शिरढोण (ता. शिरोळ) तसेच अन्य ठिकाणी महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या मंदिरांची स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून समाजाचे विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिक्षक म्हणून काम करणारे डी. जी. बेडगे, पी. ए. कोळी यांनी शिक्षणात कोळी समाजातील मुलांचे प्रमाण वाढावे म्हणून २१ जानेवारी १९६८ रोजी कोल्हापूर जिल्हा कोळी समाज विकास मंडळाची स्थापना केली. समाजातील मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देणे, त्यांना शालेय साहित्य मोफत उपलब्ध करून देणे असे उपक्रम सुरू केले. शिवाय समाजातील अशिक्षितपणा आणि असंघटितपणा घालविण्यासाठी दरमहा मंडळातर्फे समाजातील बांधवांची बैठक घेणे सुरू केले. या बैठकीद्वारे शिक्षणाचे महत्त्व, शासनाच्या सोयी-सुविधा, नोकरीविषयक मार्गदर्शन, व्यवसाय-उद्योग, आदींबाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात येत होते. मंडळाच्या नियमानुसार दर पाच वर्षांनी वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन पदाधिकारी व कार्यकारिणीची निवड केली जाते. माजी अध्यक्ष ए. के. कोळी व माजी सचिव ल. रा. पंडित यांनी मंगळवार पेठेत विद्यार्थ्यांसाठी जागा भाड्याने घेऊन वसतिगृह सुरू केले. यात विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येत होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळे तीन वर्षांत वसतिगृह बंद करावे लागले.
केंद्र शासनाच्या १९७६ च्या अधिसूचनेनुसार समाजास अनुसूचित जमातीचे दाखले मिळू लागले. शासकीय नोकरी मिळाली. मात्र, बिगर आदिवासी स्वरूपाचे फायदे घेत आहेत म्हणून खोटे ठरवून युवकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पुराव्याच्या आधारे न्यायालयीन लढा सुरू होता. त्यासाठी मंडळाने समाजबांधवांकडून आर्थिक मदत जमा करून लढा दिला. त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे निराशा निर्माण झाली. त्यानंतर मंडळाला ऊर्जितावस्था मिळावी, यासाठी २७ एप्रिल २०१० रोजी आदिवासी कोळी समाज वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करून समाजबांधवांनी कार्य सुरू ठेवले आहे.
शिक्षणाच्या जोरावर सक्षमतेच्या दिशेने हा समाज वाटचाल करीत आहे. तो आता केवळ आपल्या पारंपरिक व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नसून अन्य क्षेत्रांतही कार्यरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतदेखील काही समाजबांधव प्रतिनिधित्व करीत आहेत.
शिक्षणासह शासनाच्या विविध खात्यांमध्ये अधिकारी, तसेच उद्योगपती, शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंता अशा क्षेत्रांत समाजबांधव कार्यरत आहेत. यात पुरुषांप्रमाणे महिलांचादेखील समावेश आहे. मनमिळावू आणि निरुपद्रवी स्वभावाच्या या समाजाने कोल्हापूरला आपलेसे केले आहे.
समाजाचे माणिक-मोती
मनोहर कोळी (शास्त्रज्ञ), सुवर्णा माटे (सहायक विक्रीकर उपायुक्त), सुभाष कोळी, दत्तात्रय कोळी, वाय. बी. पाटील (अभियंता), प्रा. बी. एस. गुरव, अमित सर्जे, अरविंद कोळी, यशोदा कोळी (जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा), बंडा माने (जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष), डॉ. मनोहर कोळी, प्रा. डॉ. पी. ए. कोळी, डॉ. बाळासाहेब कोळी, गजानन कोळी, दिलीप कोळी, विश्वास कोळी, विनायक कोळी, अरुण कोळी, मिलिंद पाटील, सविता कोळी.
समाजाची कार्यकारिणी
दिलीप कोळी (अध्यक्ष), ईश्वरा कोळी (उपाध्यक्ष), संजय कोळी (सचिव), दत्तात्रय कोळी (खजानीस), नारायण कोळी (खजानीस), नारायण कोळी, उत्तम सर्जे, विलास चव्हाण, मारुती पुजारी, संजय कोळी, रावसाहेब कोळी (सदस्य).
समाजबांधव पारंपरिक व्यवसायासह अन्य क्षेत्रांत मोलाची कामगिरी करीत आहेत. समाजाचे विविध उपक्रम संघटितपणे करता यावेत यासाठी शहरात समाजभवनासाठी जागेची आवश्यकता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने कोळी समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी असोसिएशनचे प्रयत्न सुरू आहेत.
- दिलीप कोळी, अध्यक्ष,
कोल्हापूर आदिवासी कोळी वेल्फेअर असोसिएशन
नसमाजबांधव पारंपरिक व्यवसायासह अन्य क्षेत्रांत मोलाची कामगिरी करीत आहेत. समाजाचे विविध उपक्रम संघटितपणे करता यावेत यासाठी शहरात समाजभवनासाठी जागेची आवश्यकता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने कोळी समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, यासाठी असोसिएशनचे प्रयत्न सुरू आहेत.
- दिलीप कोळी, अध्यक्ष,
कोल्हापूर आदिवासी कोळी वेल्फेअर असोसिएशन
भाग्यश्री वधू-वर मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजातील कलाकारांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविले जातात. त्यासह आदिवासी कोळी समाज सहकारी गृहनिर्माण संस्था, महर्षी वाल्मीकी पतसंस्थेच्या माध्यमातून घरासह उद्योग-व्यवसायासाठी समाजबांधवांना आर्थिक मदतीचा हात दिला जात आहे. महिला मंडळाची स्थापना केली असून, याद्वारे गृहउद्योग, महिला भिशी असे उपक्रम सुरू आहेत.