कळंबीमधील कोळी बांधवांची पुन्हा झाली ताटातूट

By Admin | Updated: August 1, 2014 23:28 IST2014-08-01T22:55:29+5:302014-08-01T23:28:28+5:30

नियतीचा अन्याय : बारा वर्षांनंतर एकत्र; पंधरा दिवसांपूर्वी भीमराव झाला बेपत्ता

Koli brothers in Kambi resume independence | कळंबीमधील कोळी बांधवांची पुन्हा झाली ताटातूट

कळंबीमधील कोळी बांधवांची पुन्हा झाली ताटातूट

मिरज : लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर विखुरलेल्या कळंबी येथील कोळी कुटुंबातील नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही मुले सुमारे बारा वर्षांपूर्वी एकत्र आली. कष्टातून जीवन उभारत असताना आता नियतीने पुन्हा त्यांची ताटातूट केली आहे. भीमराव हा गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक बेपत्ता झाला आहे. कोळी बंधंूवरील या आघाताने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे.
लहानपणी आईचा मृत्यू झाल्याने व वडील बेपत्ता झाल्याने नरसाप्पा, भीमराव व जयश्री ही तीन बालके अनाथ झाली. कालांतराने नरसाप्पा व भीमराव यांच्यापासून त्यांची लहान बहिण जयश्रीची ताटातूट झाली. बहिणीच्या शोधात पुणे व मिरज येथे फिरत असताना कळंबी येथील विलासमती कलगोंडा पाटील यांनी नरसाप्पा व भीमराव यांना घरी नेऊन त्यांचा सांभाळ केला. त्याच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर ‘लोकमत’ने सुमारे बारा वर्षांपूर्वी याबाबत वृत्त प्रसिध्द केले होते. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे नरसाप्पा व भीमराव यांची त्यांच्या बहिणीशी भेट झाली. याबाबतचे वृत्तही ‘लोकमत’च्या तत्कालीन अंकात प्रसिध्द झाले होते.
बारा वर्षांपूर्वी एकत्र आलेली भावंडे एकमेकांच्या संपर्कात होती. तिघा भावंडांचा सांभाळ करणाऱ्या विलासमती पाटील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. आई-वडिलांविना लहानपण गेलेली ही भावंडे आता मोठी झाली आहेत. नरसाप्पा हे सध्या कळंकी येथे सायकल व गाड्यांचे पंक्चर काढण्याचे काम करतात. तर छोटा भाऊ भीमराव हा नुकताच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्यांची बहीण जयश्री ही पुणे येथे नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करुन एका रुग्णालयात नोकरीस असल्याचे नरसाप्पा यांनी सांगिले. नरसाप्पा यांना शासनाच्या घरकुल योजनेतून घर मंजूर झाले आहे. शासनाकडून मिळालेला निधी व कष्टातून जमविलेल्या पैशातून ते कळंबी येथे घराची उभारणी करीत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा विवाह झाला आहे.
कोळी बंधूंच्या जीवनात आता सुखाचे दिवस येत असतानाच नियतीने पुन्हा एकदा या कुटुंबावर अन्याय केला आहे. तिघा भावंडांपैकी भीमराव हा १४ जुलैच्या रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला आहे. चार दिवस शोधाशोध करून व वाट पाहून नरसाप्पा यांनी भीमराव बेपत्ता झाल्याची फिर्याद मिरज ग्रामीण पोलिसांत दिली आहे. कळंबीतील सामाजिक कार्यकर्ते कबीर मुजावर यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून याबाबत हकीकत सांगितली. कोळी बंधूवर झालेल्या या आघातामुळे ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Koli brothers in Kambi resume independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.