कोल्हापूरची पुरणपोळी-मोदक दिल्लीत
By Admin | Updated: January 12, 2016 00:49 IST2016-01-12T00:49:48+5:302016-01-12T00:49:48+5:30
शनिवारपासून खाद्यमहोत्सव : स्वयंप्रेरिका संस्थेच्या महिला सहभागी

कोल्हापूरची पुरणपोळी-मोदक दिल्लीत
कोल्हापूर : दिल्लीत येत्या शनिवारपासून (दि. १६) सुरू होणाऱ्या खाद्यमहोत्सवात कोल्हापूरची पुरणपोळी व उकडीची मोदकाचे स्टॉल्स लागणार आहेत. त्यासाठी येथील स्वयंपे्ररिका संस्थेच्या आठ महिला दोन दिवसांत दिल्लीला रवाना होणार आहेत. साडेचार हजार पोळ््या व तेवढ्याच मोदकांची आॅर्डर या महिलांना मिळाली आहे.
दिल्लीत प्रतिवर्षी हा महोत्सव भरला जातो. त्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, लघुउद्योग महामंडळ आणि साहित्य संस्कृती मंडळाच्यावतीने होते. दिल्लीतील प्रसिद्ध दिल्ली हाट परिसरात हा महोत्सव १६ ते ३१ जानेवारीपर्यंत भरवला जातो. महाराष्ट्राच्या विविध प्रांतातील खाद्यपदार्थांसह इतरही वस्तूंना राज्याबाहेर मार्केट उपलब्ध व्हावे हा या महोत्सवाचा हेतू आहे. कोल्हापुरातून खाद्यपदार्थांशिवाय कोल्हापुरी चप्पल, चांदीच्या वस्तूंचे स्टॉल्सही लावण्यात येणार आहेत.
कोल्हापुरात चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ करणारी संस्था म्हणून स्वयंपे्ररिका औद्योगिक महिला संस्थेच्या आठ महिलांना खास बोलावून घेण्यात आले आहे. त्यामध्ये अस्मिता साळवी, संगीता पुनाळकर, राजश्री कुंभार, सुनीता कुंभार, श्रीमती लक्ष्मी इंगवले, पल्लवी पवार, आक्कूताई सुतार, अंजना सगरे यांचा समावेश आहे. त्यातील प्रत्येकी तिघी पोळ््या व मोदक करणार आहेत तर दोघी भाकरी-पिठलं, ठेचा व धपाटे करणार आहेत. त्यासाठी हिरवा व तांबडा प्रत्येकी पाच किलोचा ठेचा अगोदरच पाठविण्यात आला आहे. त्याशिवाय मागणीनुसार ५०० गूळपोळ््याही पाठविल्या आहेत. या महिलांना त्यांच्या खाद्यपदार्थांचे तरी चांगले पैसे मिळतातच त्याशिवाय प्रवासखर्च आणि राहण्याची सोयही शासनाकडून केली जाते.
यासंदर्भात माहिती देताना या महोत्सवाच्या संयोजक श्रीमती शुभांगी चिपळूणकर म्हणाल्या, ‘आम्हाला चांगल्या प्रतीचे कोल्हापुरी शाकाहारी जेवण करून देणाऱ्या महिलांची गरज होती. स्वयंप्रेरिका संस्थेकडे आम्ही तसा आग्रह धरला होता परंतु त्यांच्या महिलाही व्यस्त असल्याने जेवण करून देणारे कुणी उपलब्ध झालेले नाही.’
अनुभव असाही...
या महोत्सवात येणारे लोक चांगले पैसे देतात; परंतु त्यांना स्वच्छता व पदार्थ आरोग्यदायी हवेत. काही वर्षांपूर्वी या महोत्सवात नागपूरहून खास मांडे करणाऱ्या कुटुंबास बोलावून घेतले होते; परंतु ते कुटुंब हा पदार्थ हातावर करताना पाहून एकाही व्यक्तीने ते खाल्ले नाही; शेवटी ते बंद करून पिठल-भाकरी करायची वेळ आयोजकांवर आली. कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रस्सासही फार चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याचे संयोजकांनी सांगितले.