कोल्हापूरच्या अतुल पाटील यांचा कझाकिस्तानात डंका, राज्य उत्पादन शुल्क विभागात ठरले पहिले 'आयर्न मॅन'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 04:55 PM2022-08-20T16:55:24+5:302022-08-20T16:56:38+5:30
कोल्हापूर : नुर सुलतान (अस्ताना) कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या अतुल पाटील यांनी 'आयर्न मॅन' किताब पटकावला. कोल्हापूर राज्य उत्पादन ...
कोल्हापूर: नुर सुलतान (अस्ताना) कझाकिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धेत कोल्हापूरच्या अतुल पाटील यांनी 'आयर्न मॅन' किताब पटकावला. कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागात ते दुय्यम निरीक्षक पदी कार्यरत आहेत. अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करून त्यांनी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागामधील पहिले 'आयर्न मॅन' होण्याचा विक्रम नोंदवला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातील 2500 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक अतुल पाटील यांनी 40 ते 44 वयोगटातील स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलिंग व 42.2 किलोमीटर रनिंग सलग 16.5 तासांमध्ये पूर्ण करावे लागते.
या तिन्ही लेवल अतुल यांनी 13 तास 46 मिनिटे 38 सेकंदामध्ये यशस्वीरित्या पूर्ण केले. यामध्ये अतुल यांनी 1 तास 25 मिनिटे 15 सेकंदांमध्ये स्विमिंग, 6 तास 48 मिनिटे 4 सेकंदामध्ये सायकलिंग व 5 तास 7 मिनिटे 48 सेकंद मध्ये रनिंग पूर्ण करत ही स्पर्धा यशस्वीरित्या पार केली. कोल्हापूरची व विभागाची प्रतिमा उंचावत त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी देशाला व कोल्हापूरला अनोखी भेट दिली.