कोल्हापूरमध्ये होणार बहुमजली पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 10:46 AM2019-11-29T10:46:30+5:302019-11-29T10:52:36+5:30

दर्शन मंडपाची जागा निश्चित होत नसल्याने दुस-या प्राधान्यक्रमाने केला जाणारा बहुमजली वाहनतळ प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

Kolhapur | कोल्हापूरमध्ये होणार बहुमजली पार्किंग

कोल्हापूरमध्ये होणार बहुमजली पार्किंग

ठळक मुद्देव्ही. के. पाटील यांची ६.३० टक्के कमी दराची निविदास्थायी समितीच्या सभेत त्यावर मंजुरीची मोहोर उमटविली जाण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडाअंतर्गत ताराबाई रोडवरील बाबूजमाल दर्ग्यासमोर उभारण्यात येणाऱ्या बहुमजली वाहनतळाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामाकरिता मागविण्यात आलेल्या व्यावसायिक तसेच तांत्रिक निविदांची छाननी पूर्ण झाली असून, त्यांवर आता स्थायी समितीची मोहोर उमटविणे बाकी राहिले आहे. कदाचित पुढील आठवड्यात कामाची वर्क आॅर्डर दिली जाईल.

शहरात येणा-या भाविक तसेच पर्यटकांच्या सोयीकरिता बहुमजली वाहनतळ उभारणे आवश्यक होते. २००९ मध्ये अशा प्रकारच्या वाहनतळास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली होती; परंतु अंबाबाई मंदिराजवळील विद्यापीठ हायस्कूल व मध्यवर्ती बसस्थानक येथे वाहनतळ उभारण्यात अडचणी आल्या; त्यामुळे गेल्या १० वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता.
अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या कामाचे नियोजन नव्याने समाविष्ट करण्यात आल्यामुळे बहुमजली वाहनतळाचा विषय पुन्हा चर्चेत आला. आराखडा मंजूर झाल्यानंतर त्यातील सात कोटींचा पहिला हप्ता महापालिका प्रशासनाकडे जमा झाला आहे. दर्शन मंडपाची जागा निश्चित होत नसल्याने दुस-या प्राधान्यक्रमाने केला जाणारा बहुमजली वाहनतळ प्रकल्प राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

सात कोटी ८४ लाखांच्या या कामासाठी आॅक्टोबर महिन्यात निविदा मागविण्यात आल्या होत्या. पहिल्या वेळेस निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मुदतवाढ देण्यात आली. त्यावेळी मात्र तीन ठेकेदारांनी काम करण्यास तयारी दर्शविली. एस अ‍ॅँड जे (सावरे आणि जिंदे), शिवप्रसाद कन्स्ट्रक्शन, पुणे आणि कोल्हापूरचे व्ही. के. पाटील इंजिनिअरिंग अ‍ॅँड कन्स्ट्रक्शन अशा तिघांनी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये व्ही. के. पाटील यांची निविदा ६.३० टक्के कमीची (बिलो) आहे. व्ही. के. पाटील यांना काम देण्याच्या प्रस्तावावर आयुक्तांची स्वाक्षरी झाली असून, हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी जाणार आहे. आज, शुक्रवारी होणा-या किंवा पुढील आठवड्यात होणा-या स्थायी समितीच्या सभेत त्यावर मंजुरीची मोहोर उमटविली जाण्याची शक्यता आहे.

कोणा आहेत व्ही. के. पाटील?
व्ही. के. पाटील हे कोल्हापूरचे सुपुत्र आहेत. दर्जा आणि गुणवत्ता या बाबतींत बांधकाम क्षेत्रात त्यांचा नावलौकिक आहे. रंकाळा तलावाच्या ऐतिहासिक संरक्षक भिंतीचे काम, शाहू खासबाग मैदानाचे सुशोभीकरण तसेच नर्सरी बागेतील शाहू समाधिस्थळाचे काम व्ही. के. पाटील यांनी केले आहे.

- असे असेल बहुमजली पार्किंग -
- ठिकाण- सरस्वती टॉकीजसमोरील पार्किंगमध्ये
- इमारतीचे स्वरूप - तीन मजली
- कार पार्किंग क्षमता - १६४
- दुचाकी- १५९
- चालकांसाठी सुविधा- रेस्ट रूम
 

Web Title: Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.