आंदोलने करणाऱ्या कोल्हापुरात आता गाव थकबाकीमुक्त होण्यासाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:22 IST2021-03-25T04:22:41+5:302021-03-25T04:22:41+5:30
कोल्हापूर: एका बाजूला वीज बिल भरणार नाही म्हणून आंदोलने होत असताना अख्खं गावच शंभर टक्के बिले भरून थकबाकीमुक्त ...

आंदोलने करणाऱ्या कोल्हापुरात आता गाव थकबाकीमुक्त होण्यासाठी स्पर्धा
कोल्हापूर: एका बाजूला वीज बिल भरणार नाही म्हणून आंदोलने होत असताना अख्खं गावच शंभर टक्के बिले भरून थकबाकीमुक्त होण्यासाठी स्पर्धा लावल्याने सुखद चित्र जिल्ह्यात दिसत आहे. गडहिग्लज या काहीशा डाेंगराळ तालुक्यात आठ दिवसांच्या अंतराने पाठोपाठ हासूर सासगिरी, वैरागवाडी, उंबरवाडी या तीन गावांनी थकबाकीचा शिक्काच पुसून टाकला आहे.
महावितरण ही सरकारची म्हणजेच जनतेची कंपनी आहे, कमी दरात वीज वापरतो तर त्याचा मोबदलाही दिला गेला पाहिजे, पण लॉकडाऊन काळातील ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मेटाकुटीस आलेल्या ग्राहकांनी वीज बिलांचा भरणाच केला नाही. साहजिकच महावितरण आर्थिक गोत्यात आली. आर्थिक ताळमेळ गळ्यापर्यंत आल्यानंतर दोन महिन्यांपासून बिले भरण्यासाठी महावितरणकडून आर्जव व कारवाई एकाच वेळी सुरु झाली. कोल्हापुरात तर यावरुन सातत्याने आंदोलने झाली. राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत शिष्टमंडळाकरवी वसूली थांबवण्याचे व लॉकडाऊन काळातील बिलांची माफी द्यावी यासाठी विनंत्या करण्यात आल्या. पण राज्यपातळीवर कोणताही ठाम तोडगा न निघाल्याने वसुलीचा धडाका व आंदोलने सुरूच राहिली. गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग एक तासभर रोखून धरून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला, पण वसुली मोहिमेवर फारसा परिणाम झाल्याचे दिसले नाही. कारवाईच्या भीतीने बिलांचा भरणार सुरूच राहिला आहे. आता संपूर्ण गावच थकबाकीमुक्त करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गडहिग्लजमध्ये सुरू झालेला हा उपक्रम आता हळूहळू अन्य तालुक्यातही सुरू होण्याच्या हालचाली सुरू झाल्याने महावितरणचा जीव भांड्यात पडला आहे.
चौकट ०१
१० लाखांचे बिल भरले
महावितरणच्या नेसरी उपविभागातील महागाव शाखा कार्यालयातंर्गत येणाऱ्या वैरागवाडी व उंबरवाडीतील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक वर्गवारीतील २६२ वीज ग्राहकांनी १० लाख ३७ हजार ४०७ रुपयांचे थकीत व चालू वीज बिल भरले आहे.
चौकट ०२
महावितरणकडून आभार
एकाच वेळी थकबाकी भरणाऱ्या गावांचे महावितरणकडून आभारही मानले जात आहेत. तसेच याला प्रोत्साहन दिल्याबद्दल महावितरणच्याच कर्मचाऱ्यांचे सत्कार होत आहेत. गडहिग्लजमधील या यशात वाटेकरी असलेले संदीप कुंभार व वैभव कुंभार या कर्मचाऱ्यांचा कार्यकारी अभियंता संजय पोवार यांच्या हस्ते सत्कार झाला.