कोल्हापूर-- यंदाची दिवाळी दोनशे कोटींची

By Admin | Updated: October 17, 2014 23:52 IST2014-10-17T23:40:16+5:302014-10-17T23:52:21+5:30

निवडणुकीचा बाजारपेठेवर परिणाम : सोने, कपडे, वाहन, इलेक्ट्रॉनिक, किराणा मालांची ‘चांदी’

Kolhapur - Two hundred crore of this year's Diwali | कोल्हापूर-- यंदाची दिवाळी दोनशे कोटींची

कोल्हापूर-- यंदाची दिवाळी दोनशे कोटींची

संतोष पाटील - कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीचे वातावरण, शेतकऱ्यांना पावसाने दिलेली चांगली साथ, सर्व उद्योगांनी दिलेला बोनस, साखर कारखान्यांचा ५० ते १०० रुपयांचा मिळणारा हप्ता, आदींमुळे यंदाच्या दिवाळीत मागील वर्षीपेक्षा बाजारातील उलाढाल किमान १५ ते २५ टक्क्यांनी अधिक होऊन २०० कोटींवर जाईल. सोन्याचा दर कमी होईल या आशेने सोने खरेदीबाबत ग्राहक संभ्रमीत असला तरीही वाहन व चैनीच्या वस्तूंची बाजारात मोठी उलाढाल अपेक्षित आहे, असा अंदाज अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
दिवाळीपूर्वीच आलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे सुरुवातीच्या काळात बाजारपेठेकडे पाठ फिरविणारा ग्राहक आता पुन्हा खरेदीसाठी सज्ज झाला आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने बळिराजाही सुखावला आहे. त्यातच उसाचा ५० ते १०० रुपयांचा हप्ता देण्याची अनेक साखर कारखान्यांनी घोषणा केली आहे. खर्चाची क्षमता असणाऱ्या शेतकरीवर्गाकडून बाजारपेठेला मोठी आशा आहे. शेतकरी, नोकरदार, कामगार वर्र्गाकडून सोने, वाहन, कपडे, इलेक्ट्रॉनिक, किराणा बाजारात मोठी उलाढाल होत आहे.
लग्नसराईमुळे सोने व चांदी उद्योगाची उलाढाल १५ टक्क्यांनी वाढते असा अनुभव आहे. दरवर्षी ही वाढ किमान ३५ ते ४० कोटींची असते. यावर्षी सोन्याचा दर आणखी कमी होईल, अशी ग्राहकांना आशा आहे. त्यामुळे फक्त सणाच्या मुहूर्तावर हौसेचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असेल, असा सोने उद्योगातील तज्ज्ञ सांगतात. कपड्यांमध्ये साड्या, रेडिमेड गारमेंटची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. मोबाईल, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, आदींच्या खरेदीत मोठी वाढ होत आहे.

ब्रँडेड जमान्याचे दिवस
निवडणुकीच्या वातावरणामुळे लेनिन, खादी, व प्युअर कॉटनच्या कपड्यांना मोठी मागणी आहे. गृहिणीचा कल साडी खरेदीकडे आहे. तरुणाई रेडिमेड गारमेंटला पसंती देत आहेत. यंदाचा सिझन अतिशय चांगला असून, मागील वर्षीपेक्षा किमान २० टक्के वाढ अपेक्षित आहे. सर्वच आघाडीच्या ब्रँडची विक्री धडाक्यात होत असून, ब्रँडेड कपडे खरेदी करण्याकडे कोल्हापूरकरांचा ओढा वाढत आहे.
- सतीश माने (व्यंकटेश्वरा गारमेंट)

मोबाईल विक्रीत वाढ
परवडणाऱ्या दरात इंटरनेट उपलब्ध होऊ लागले आहे. व्हॉटस् अ‍ॅप व फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा मोबाईलच्या माध्यमातून होणार मोठा वापर. यामुळे स्मार्ट फोन खरेदीकडे तरुणाईसह सर्वच मोबाईलधारकांचा ओढा आहे. अधिक स्टोरेज क्षमतेसह सुपरफास्ट सिस्टीम असलेल्या टच स्क्रीन मोबाईल्स्ना विशेष मागणी आहे.
- संदीप नष्टे (एनव्ही कम्युनिकेशन)

पर्यटन उद्योग बहरतोय
कोल्हापुरातून पर्यटनासाठी प्लॅन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. राजस्थान, केरळ, कुलुमनाली, दक्षिण भारत ही देशांतर्गत ठिकाणे तर हाँगकाँग-सिंगापूर, थायलंड मलेशिया व दुबई या परदेशांतील ठिकाणांना कोल्हापूरकरांचा अधिक पसंती आहे. मागील वर्षीपेक्षा दिवाळीच्या सुटीमध्ये पर्यटनात २० टक्के वाढ दिसत आहे. दुसऱ्या टप्प्यांत विदेश वारी करणाऱ्यांमध्ये युरोप व तुर्की देशांना पसंती मिळत आहे. - उमेश पवार (हिरो हॉलिडेज्)

२५ टक्क्यांपर्यंत वाढ टक्के वाढ
प्रत्येक सणावेळी बाजारातील उलाढालीत वाढ होत असतेच. बाजारातील स्थिती पाहता यंदाच्या दिवाळीत कोल्हापुरातील उलाढाल मागील वर्षीपेक्षा किमान २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढलेली असेल. त्यामध्ये वाहन, गारमेंट, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स व किराणा बाजाराचा मोठा वाटा असेल. लोकांच्या हातात चांगले पीक, बोनस, मंदीनंतर उद्योगाला मिळालेली उभारी यामुळे पैसा आल्याने खरेदीला उधाण येईल.
- डॉ. विजय ककडे (अर्थतज्ज्ञ)

जुन्या व नव्याचा मेळ
वाहन खरेदी कधी नव्हे ती यावेळी सोपी झाली आहे. वाहन कंपन्यांनी एक्स्चेंज व सुलभ कर्जपुरवठा, कर्जाची दीर्घ मुदत, कॅशबॅक, हमखास भेटवस्तू, लकी ड्रॉ, आदी योजना देऊ केल्या आहेत. सणांमध्ये वाहन खरेदीला मोठा वाव असतो. एक्स्चेंज स्कीममध्ये जुन्या वाहनाला चांगली किंमत मिळते, तर नव्या वाहनांवरही भरघोस सूट मिळत असल्याने चार चाकी खरेदीचा बेत आखला आहे. - अभिजित आळवेकर (ग्राहक)
गतवर्षीपेक्षा १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित
गेली काही वर्षे मरगळेल्या वाहन उद्योगाला आता ‘अच्छे दिन’आल्याची जाणीव होत आहे. विशेषत: चारचाकी वाहनांच्या खरेदीत मोठी वाढ होताना दिसत आहे. मागील वेळेपेक्षा या व्यवसायात किमान १५ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. मागील वर्षी दिवाळीत नऊ हजार नव्या दुचाकी, तर दीड हजारांहून अधिक मोटारगाड्यांची विक्री झाल्याचे परिवहन कार्यालयातील आकडेवारी सांगते. दिवाळीचे पदार्थ बाजारातून खरेदी करण्याकडेही लोकांचा कल वाढत आहे. एकूणच कोल्हापुरातील बाजारपेठेचा रंग पाहता एकूण उलाढाल २०० कोटींपेक्षा अधिक होईल, असा अंदाज विजय ककडे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Kolhapur - Two hundred crore of this year's Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.