Kolhapur-Tirupati Airlines launches 'Joloshi' atmosphere | कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेला ‘जल्लोषी’ वातावरणात प्रारंभ
कोल्हापूर विमानतळावरून कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवेला प्रारंभ झाला. फर्स्ट फ्लाईटने तिरूपतीला जाणाऱ्या प्रवाशांनी आनंदातच आपल्या नातेवाइकांना निरोप दिला. छाया : दीपक जाधव

ठळक मुद्देविमानतळाला मराठमोळा बाज : फर्स्ट फ्लाईट फुल्ल ‘इंडिगो’मार्फत नॉनस्टॉप सेवा सुरू

कोल्हापूर : ढोल-ताशा, लेझीम पथक वाद्यांसह कोल्हापुरी पद्धतीचा मराठमोळा बाज आणत रविवारी सकाळपासून कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर इंडिगो कंपनीद्वारे ‘नॉन स्टॉप’ विमानसेवा सुरू करण्यात आली. कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील फर्स्ट फ्लाईटला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने ती ‘फुल्ल’ होती. विमानाचे उड्डाण झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.

कोल्हापूरहून तिरूपती देवदर्शनला जाणाºया भाविकांची संख्या मोठी आहे. त्याचा विचार करून ‘इंडिगो’द्वारे ही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावर अलायन्स एअर कंपनीने दि. ९ डिसेंबरपासून सेवा सुरू केली. ही सेवा नियमितपणे सुरू आहे. त्यापाठोपाठ आता रविवारपासून ‘इंडिगो’कडून हैदराबाद-कोल्हापूर आणि कोल्हापूर-तिरूपती मार्गांवर रोज विमानसेवा सुरू केली आहे.

विमानतळाबाहेर प्रवाशांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात व लेझीमच्या निनादात करण्यात आले. कंपनीचे कर्मचारी डोक्यावर कोल्हापुरी फेटा परिधान करून, तर महिला कर्मचारी डोक्यावर फेटा व नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या गणवेशात प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज होते. प्रारंभी महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, विमानतळ प्रबंधक कमलकुमार कटारीया, टी. सी. कांबळे, आनंद शेखर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, तर तिरूपतीकडे फर्स्ट फ्लाईटने जाणाºया प्रवाशांच्या हस्ते केक कापून जल्लोष केला.

सकाळी ९ वाजता हैदराबादहून सुमारे ६५ प्रवासी घेऊन ‘इंडिगो’ कंपनीचे विमान कोल्हापूर विमानतळावर आले. विमानतळावर भारतीय तिरंगा आणि इंडिगो कंपनीचा निळा झेंडा दाखवत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या कोल्हापूर-तिरूपती विमानसेवेला ग्रीन सिग्नल दिला. सकाळी ९.४५ वाजता ६५ प्रवासी घेऊन त्या विमानाने तिरुपतीच्या दिशेने उड्डाण केले. यावेळी इंडिगो कंपनीचे अधिकारी एस. मुरगल, शार्नला डिसोजा, नाडीया डिसोजा, विशाल भार्गव, आदी उपस्थित होते.

कार्यालय फुग्यांनी सजले

कोल्हापूर विमानतळावर ‘इंडिगो’ कंपनीच्यावतीने बुकिंग कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी हे कार्यालय फुगे, फुलांनी सजविले होते.

प्रवाशांचे लाडू देऊन स्वागत

हैदराबादहून सकाळी ९ वाजता विमान कोल्हापुरात आले. यातून आलेल्या ६५ प्रवाशांना लाडू देऊन स्वागत करण्यात आले.

कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. कोल्हापूर विमानतळावरून आता इंडिगो आणि अलायन्स एअर कंपनीच्यावतीने विमानसेवा सुरू झाली आहे. भविष्यात कोल्हापुरातून अनेक ठिकाणी सेवा देण्याचा इंडिगो कंपनीचा प्रयत्न राहील.
- कमलाकर कटारिया,
प्रबंधक, कोल्हापूर विमानतळ.

 


करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या आशीर्वादाने कोल्हापुरात विमानसेवा सुरळीत झाली आहे. विमानतळाचा विस्तार आणखी वाढवावा. महापालिकेचे आवश्यक असणारे सर्व सहकार्य देऊ.
- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी,
आयुक्त, कोमनपा.


 

 


Web Title: Kolhapur-Tirupati Airlines launches 'Joloshi' atmosphere
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.