कोल्हापूर : टोलविरोधी समितीचा रास्ता रोको
By Admin | Updated: September 27, 2014 00:52 IST2014-09-27T00:50:12+5:302014-09-27T00:52:16+5:30
पथकर दिवे बंदच : उमा टॉकीज-फोर्ड कॉर्नर रस्ताप्रश्नी पोलिसांत तक्रार

कोल्हापूर : टोलविरोधी समितीचा रास्ता रोको
कोल्हापूर : दुतर्फा गटारीचे अर्धवट बांधकाम, आयआरबी कंपनीने उभे केलेले पथकर दिवे बंद स्थितीत, तर दोनजणांना गमवावा लागलेला जीव, असा आरोप करत आज, शुक्रवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने उमा टॉकीज ते लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर या रस्त्या या प्रश्नासाठी तीव्र निदर्शने करत रास्ता रोको केला. दरम्यान, याप्रश्नी प्रवीण दादासाहेब इंदुलकर (रा. १९४९ ई वॉर्ड, राजारामपुरी १३ वी गल्ली) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत तक्रार दिली आहे. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून त्यांच्या आदेशाने योग्य ती चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन पोलिसांनी समितीला दिले. ‘आयआरबी’ने लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज हा रस्ता केला. त्यांच्याकडून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने करून घेतला. या प्रकल्पाची टोलवसुली सुरू आहे. रिलायन्स मॉलसमोरील जुना लोखंड बाजार रस्त्यावर मोठा गटारीसाठी खोदलेला रस्ता उघडा ठेवण्यात आलेला आहे. हीच स्थिती धान्य बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला आहे. त्याचबरोबर रस्त्यावर धोकादायक दुभाजक आहे व पथकर दिवे बंद आहेत. या आंदोलनात निमंत्रक निवास साळोखे, रामभाऊ चव्हाण, जयकुमार शिंदे, बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, किसन कल्याणकर, रमेश मोरे, अशोक पोवार, अॅड. रमेश बदी, प्रसाद जाधव, सुनील मोरे , श्रीकांत भोसले आदींचा सहभाग होता. दरम्यान, या प्रकल्पासाठी कोल्हापूर महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व आय.आर.बी. कोल्हापूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यामध्ये त्रिसदस्यीय करार करण्यात आला आहे. त्यानुसार या सर्वांवर कारवाई करावी, अशी फिर्याद प्रवीण इंदुलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)