कोल्हापूर : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तर शालेय हॉकी स्पर्धेत १७ वर्षांखालील मुले व मुलींमध्ये पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी संघाने कोल्हापूर विभाग संघावर मात करीत बुधवारी विजेतेपदावर आपले नाव कोरले.मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे सकाळच्या सत्रात मुलांमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनी संघाने कोल्हापूर विभाग (विद्यामंदिर हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, इस्लामपूर) संघाचा टायब्रेकरवर ४-३ असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
क्रीडा प्रबोधिनी, पुणे विजयी संघ
संपूर्ण वेळेत अटीतटीच्या लढतीत सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे सामन्यांचा निकाल टायब्रेकरवर लावण्यात आला. यात क्रीडा प्रबोधिनीकडून सचिन कोळेकर, कुणाल धुमाळ, धैर्यशील जाधव, अर्जुन भोसले यांनी; तर कोल्हापूरकडून तेजस महाडिक, यश उरणकर, प्रज्ज्वल कांबळे यांनी गोलची नोंद केली.
क्रीडा प्रबोधिनीच्या विजयी संघात आदित्य भिसणे, मयूर भांडवडे, महेश पाटील, कुणाल धुमाळ, सचिन कोळेकर, धैर्यशील जाधव, अनिल कोळेकर, सागर शिनगाडे, संतोष भोसले, आदित्य लाळगे, योगेश थत्ते, अर्जुन भोसले, तुषार देसाई, प्रशिक्षक अजित लाक्रा यांचा समावेश आहे.सतरा वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात क्रीडा प्रबोधिनी, पुणे संघाने कोल्हापूर विभागा (न्यू इंग्लिश स्कूल, नूल) वर २-० अशी एकतर्फी मात केली. यात क्रीडा प्रबोधिनीकडून काजोल आटपाडकर, ओशिनी बनसोडे यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद करीत संघाला विजेतेपदाला गवसणी घालण्यास मदत केली.