कोल्हापूर --आठ जागांवर शिवसेनेची हवा ! जिल्ह्यातील चित्र : मोठे यश मिळण्याची शक्यता;
By Admin | Updated: October 16, 2014 00:48 IST2014-10-16T00:31:26+5:302014-10-16T00:48:43+5:30
मतदानात करवीर पुढे, तर कोल्हापूर शहर मागे.. राष्ट्रवादीला बसणार फटका

कोल्हापूर --आठ जागांवर शिवसेनेची हवा ! जिल्ह्यातील चित्र : मोठे यश मिळण्याची शक्यता;
विश्वास पाटील - कोल्हापूर -विधानसभा निवडणुकीसाठी आज, बुधवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर लोकांना आता गुलाल कुणाला, याचे वेध लागले आहेत. मतदारसंघात आज तयार झालेले वातावरण, पडद्याआड झालेल्या घडामोडी, मतदानाचा वाढलेला टक्का, प्रस्थापितांच्या विरोधातील नाराजी, जातीच्या राजकारणाची उसळी आणि पैशासह सर्व आयुधांचा वापर याचा मतदानावर परिणाम होणार हे विचारात घेतले तरी आजच्या घडीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील दहांपैकी आठ जागा विजयाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राधानगरी व शिरोळची जागा शिवसेनेने जिंकली असल्याचेच चित्र त्या त्या मतदारसंघात होते. निकाल बदलला तर करवीर, कागल, चंदगड आणि शाहूवाडी या मतदारसंघांतही खळबळ उडू शकते. मावळत्या विधानसभेत कोल्हापूर उत्तर, करवीर आणि हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. या जागा निवडणूक स्पर्धेत आहेतच; शिवाय राधानगरी, शिरोळसह, कागल, चंदगड आणि शाहूवाडी या मतदारसंघांतही शिवसेनेचे उमेदवार स्पर्धेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन ठिकाणी, तर काँग्रेसला शिरोळमध्ये त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर उत्तरमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचेच पारडे जड ठरत आहे. करवीर मतदारसंघात काँग्रेसचे पी. एन. पाटील व आमदार चंद्रदीप नरके यांच्यात तुल्यबळ लढत झाली. तिथे ‘जनसुराज्य’चे राजू सूर्यवंशी व भाजपचे केरबा चौगले यांची मतांची झेप किती, यावर गुलाल कुणाला हे ठरणार आहे. अशीच स्थिती कागलमध्ये हसन मुश्रीफ व शिवसेनेचे संजय घाटगे यांच्या लढतीत आहे. या लढतीचा अंदाज बांधणे अवघड बनले आहे. चंदगड मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर विरुद्ध शिवसेनेचे नरसिंगराव पाटील यांच्यातच चुरस झाली. हातकणंगले मतदारसंघात कालपर्यंत काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे हे पुढे असल्याचे वातावरण होते; परंतु अखेरच्या दोन दिवसांत बऱ्याच उलथापालथी झाल्या. त्यामुळे आज मतदानानंतर तिथे आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची हवा झाली. शाहूवाडी मतदारसंघात विनय कोरे यांना शिवसेनेचे सत्यजित पाटील यांनी जोरदार लढत दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेसमधील जागा..
राधानगरी:प्रकाश आबिटकर
शिरोळ:उल्हास पाटील
हातकणंगले:सुजित मिणचेकर
कोल्हापूर उत्तर:राजेश क्षीरसागर
करवीर:चंद्रदीप नरके
चंदगड:नरसिंगराव पाटील
कागल:संजयबाबा घाटगे
शाहूवाडी:सत्यजित पाटील
शिवसेनेचे वारे कशामुळे ?
जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेचे वारे वाहण्यामागे काही कारणे आहेत. त्यातील प्रस्थापितांच्या विरोधातील सुप्त लाट हे एक महत्त्वाचे कारण आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक गट शिवसेनेत गेल्याने कागलसह राधानगरी व चंदगड मतदारसंघांत शिवसेना मजबूत झाली. दोन्ही काँग्रेसला पर्याय म्हणून शिवसेनेलाच लोकांनी पसंती दिली. मुख्यत: तरुणांत या पक्षाबद्दल कायमच आकर्षण असते.
मतदानात करवीर पुढे, तर कोल्हापूर शहर मागे
कोल्हापूर : दहापैकी सर्वांत कमी मतदान कोल्हापूर उत्तर मतदारसंघात (६२ टक्के) झाले. शेजारच्या करवीर मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वांत जास्त ८४.३७ टक्के मतदान झाले.
लोकांनी मतदानासाठी जास्तीत जास्त बाहेर पडावे यासाठी सर्वाधिक जागृती शहरात होते. मतदार केंद्रेही जवळ असतात. मतदानास जाण्यासाठी सोयी-सुविधा उपलब्ध असतात. मतदार सुशिक्षित असतो. शिवाय आज सुटी असल्याने मतदान जास्त टक्क्यांनी होण्यास अडचण नव्हती. असे असूनही या मतदारसंघात सगळ्यांत कमी मतदान झाले. लढतीत तुलनेत कमी चुरस होती आणि ग्रामीण भागात जसे हाताला धरून मतदान बाहेर काढता येते, तसे शहरात करता येत नाही, हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. गावात अजूनही राजकारणाबद्दल टोकाची ईर्षा असते. त्यामुळे आपला ‘साहेब’ आला पाहिजे, यासाठी एकेक मतासाठी आटापिटा होतो; तसे शहरात घडत नाही.