कोल्हापूर : कबड्डी स्पर्धेत शाहू कॉलेजचे यश-न्यू हायस्कूल, न्यू मॉडेल विजयी
By Admin | Updated: October 2, 2014 23:30 IST2014-10-02T23:25:44+5:302014-10-02T23:30:46+5:30
आष्टा : राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

कोल्हापूर : कबड्डी स्पर्धेत शाहू कॉलेजचे यश-न्यू हायस्कूल, न्यू मॉडेल विजयी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय कबड्डी (महिला) स्पर्धेत राजर्षी शाहू कॉलेजच्या विद्यार्थिनींनी वाणिज्य महाविद्यालय, कोवाडचा पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले.
आजरा येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांनी वाणिज्य महाविद्यालयावर ४२-८ अशा गुणांनी मात केली. ‘शाहू’ची कर्णधार पूजा पाटील हिने चमकदार कामगिरी केली. विजेत्या संघास प्राचार्य डॉ. के. एम. नलवडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विक्रमसिंह नांगरे-पाटील, प्रा. जी. एम. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर, पुण्याची विजयी सुरुवात
आष्टा : राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ
आष्टा : येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलींच्या गटात पुणे विभागाने कोल्हापूरचा ७ गुणांनी, तर १९ वर्षाखालील मुलांच्या गटात कोल्हापूरने नागपूरचा ५२ गुणांनी पराभव केला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात पुण्याने कोल्हापूरवर ७ गुणांनी विजय मिळवला.
पुणे विभागाच्या ऐश्वर्या शिंदे, आरती घोडके, हर्षदा हुंडारे, संजना पोळ यांनी चमकदार खेळ केला. अमरावतीवर नाशिकने २९ गुणांनी, तर औरंगाबादवर मुंबईने २५ गुणांनी विजय मिळवला. आष्टा (ता. वाळवा) येथील अण्णासाहेब डांगे संकुलात बुधवारी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सचिव अॅड. चिमण डांगे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्याहस्ते झाले.१९ वर्षाखालील मुलांच्या गटात कोल्हापूरने नागपूरचा ५२ गुणांनी पराभव केला. कोल्हापूरच्या कृष्णा मदने, रवींद्र कुमावत, सतपाल कुमावत, कन्हैय्या बोडरे, प्रदीप माने, अनिकेत बोडरे, रोहन तेवरे, क्रांती पाटील यांनी सुरुवातीपासून वर्चस्व राखत विजय मिळविला. लातूरने पुण्याचा ३१ गुणांनी, तर औरंगाबादने मुंबईचा १५ गुणांनी पराभव केला. १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अमरावतीला पुढे चाल देण्यात आली. मुंबई विरुध्द कोल्हापूर विभागात कोल्हापूरने १४ गुणांनी विजय मिळविला. नाशिकवर पुणे विभागाने ३४ गुणांनी, तर नागपूरने लातूरचा ८ गुणांनी पराभव केला. १४ वर्षे मुलांत लातूर, तर मुलींत पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, १७ वर्षाखालील मुलांत अमरावती, मुलींमध्ये मुंबई, पुणे, नाशिक, लातूर विभागाने तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या गटात कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद या विभागांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. (वार्ताहर)
न्यू हायस्कूल, न्यू मॉडेल विजयी
कोल्हापूर : जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर महापालिका यांच्यावतीने म.न.पा.स्तर सतरा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आज, गुरुवारी न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, न्यू हायस्कूल यांनी विजय मिळविले.
मेरी वेदर मैदान, कसबा बावडा येथे पहिला सामना न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल विरुद्ध शाहू दयानंद हायस्कूल यांच्यात झाला. हा सामना न्यू मॉडेलने सहा गडी राखून जिंकला. दुसरा सामना न्यू हायस्कूल विरुद्ध शाहू विद्यालय यांच्यात झाला. हा सामना न्यू हायस्कूलने ८ गडी राखून जिंकला.
तिसरा सामना न्यू इंग्लिश मॉडेल इंग्लिश स्कूल विरुद्ध हनुमंतराव चाटे स्कूल यांच्यात झाला. हा सामना न्यू मॉडेलने पाच गडी राखून जिंकला. (प्रतिनिधी)