कोल्हापूर-सांगली मार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडे

By Admin | Updated: May 12, 2016 00:50 IST2016-05-11T23:51:21+5:302016-05-12T00:50:51+5:30

दिल्लीतील बैठकीत निर्णय : राजू शेट्टी यांचा पाठपुरावा; प्रक्रिया महिन्यात पूर्ण करणार - नितीन गडकरी

Kolhapur-Sangli road to National Authority | कोल्हापूर-सांगली मार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडे

कोल्हापूर-सांगली मार्ग राष्ट्रीय प्राधिकरणाकडे

कोल्हापूर : कोल्हापूर-सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचा निर्णय बुधवारी नवी दिल्लीतील संयुक्त बैठकीत झाला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. रस्ता वर्ग करण्याची प्रक्रिया महिन्यात पूर्ण करण्याची ग्वाही गडकरी यांनी दिली. या रस्त्याच्या कामासाठी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याच आग्रहावरून ही बैठक झाली.
बैठकीतील निर्णयांची माहिती खासदार शेट्टी यांनी पत्रकारांना दिली. बैठकीस राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, आदी मान्यवर उपस्थित होते. नागपूर ते रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग यापूर्वीच मंजूर झाला आहे. हा मार्ग सांगली-कोल्हापूर मार्गावरूनच जातो. हा रस्ता खासगीकरणातून ‘बीओटी’ तत्त्वावर पूर्ण होत आला आहे. त्यामुळे टोल घेतला जाणार आहे. या टोलवसुलीस खासदार शेट्टी यांनी विरोध केला आहे.
बैठकीत शेट्टी म्हणाले, ‘सांगली-कोल्हापूर हा रस्ता वाहतुकीस अपुरा आहे. शिरोली औद्योगिक वसाहत, कोल्हापूर, सांगली व जयसिंगपूर शहरांतील नोकरदार वर्ग मोठा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सात मीटर रुंदीचा सेवा रस्ता आवश्यक आहे. सुप्रीम कंपनीने केलेले काम पहिल्याच वर्षी खराब व्हायला सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या दुभाजकाची रुंदी १२० मीटर आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्ता दुभाजकही राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या निकषांप्रमाणे व्हावेत.’


टोलचा झोल वाढणार
या रस्त्याचे काम अजून पूर्ण झाले नसतानाही ठेकेदार कंपनीने मध्यंतरी टोलवसुलीच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याला जयसिंगपूर व शिरोळ तालुक्यांतून जोरदार विरोध झाला.
हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाचा हिस्सा बनल्याने आता मधल्याच ५२ किलोमीटरसाठी टोलवसुली करता येणार नाही, असे काहीचे म्हणणे आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता झालेल्या रस्त्याच्या कामाचे पैसे देऊन हा रस्ता आपल्या ताब्यात घेईल, परंतु ही प्रक्रिया फार लांबची आहेच; शिवाय महामार्ग प्राधिकरणही टोलवसुली करु शकते.
स्वत: गडकरी हे टोलचे जनक असून, चांगला रस्ता हवा असेल तर टोल दिला पाहिजे, अशी भूमिका मांडणारे आहेत. त्यामुळे रस्ता वर्ग केला म्हणजे टोल रद्द झाला, असे नसून उलट टोलचा तिढा अधिक घट्ट झाला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. राज्य शासनाकडे टोल नको म्हणून भांडता तरी येत होते. महामार्ग प्राधिकरण मात्र त्याची कितपत दखल घेते, हा प्रश्नच आहे.


कोल्हापूर-सांगली रस्ता ५२.६१ किलोमीटर
रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ३ दर्जाचा आहे. हा रस्ता पश्चिम किनाऱ्यावरील रत्नागिरी बंदर व महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहराला जोडतो. या रस्त्याचा रत्नागिरी ते कोल्हापूर हा भाग केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २०४ म्हणून यापूर्वीच घोषित केला आहे. कोल्हापूर-सांगली या रस्त्याची एकूण लांबी ५२.६१ किलोमीटर आहे. या रस्त्यावरील प्रतिदिन वाहतूक ४९०५० टन इतकी आहे. मुख्यत: कर्नाटक व आंध्र प्रदेशमधील वाहतूक जास्त आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या मूळ प्रस्तावास पायाभूत समितीने २६ डिसेंबर २००७ रोजी मंजुरी दिली आहे.


कोल्हापूर-सांगली चौपदरीकरण रस्ता राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, खासदार राजू शेट्टी, उदयनराजे भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Kolhapur-Sangli road to National Authority