कोल्हापुरात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता धूसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:16 IST2021-06-19T04:16:48+5:302021-06-19T04:16:48+5:30
विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूरचा गुरुवारी संपलेल्या आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.८ टक्क्याने कमी झाला असला तरी ...

कोल्हापुरात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता धूसर
विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूरचा गुरुवारी संपलेल्या आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.८ टक्क्याने कमी झाला असला तरी अजूनही राज्यात तो सर्वाधिक १३.७७ असल्याने जिल्ह्यात लागू असलेले निर्बंध कमी होण्याची शक्यता धूसर आहे. राज्य शासनाने निर्बंध शिथिल करण्यासाठी पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड किती उपलब्ध आहेत, याचा निकष लावला आहे. त्यामध्ये कोल्हापूर राज्यात दोन नंबरवर असून, ५४.७८ टक्के बेड सध्या वापरात आहेत. राज्यात सर्वांत कमी दर गोंदिया जिल्ह्याचा ०.२७ इतका आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने १७ जूनचा अहवाल जाहीर केला आहे. राज्य शासनाने ४ जूनला याच अहवालाच्या आधारे जिल्हानिहाय निर्बंध शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्याच्या मार्गदर्शक सूचना घालून दिल्या आहेत. राज्यात गुरुवारअखेर १६ हजार ५७० ऑक्सिजन बेड वापरात आहेत आणि त्यामध्ये घट होत आहे हे चांगले निदर्शक आहे. कोल्हापुरातील रोजची रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाणही अजूनही आटोक्यात यायला तयार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या सोमवारी कोल्हापुरात बैठक घेऊन चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले. त्याचवेळेला रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवरही कारवाई करण्यास सांगितले होते. परंतु चाचण्या अजून वाढलेल्या नाहीत आणि हातात पिशवी घेऊन भाजीपाला आणायला जाणाऱ्यांची संख्याही कमी होत नाही. गुरुवारी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही त्यासंबंधीची हतबलता व्यक्त केली आहे. कोल्हापूरचे लोक सहकार्य करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. पॉझिटिव्हिटी दर जर कमी आला नाही तर कडक लॉकडाऊन करण्याचा इशारा मंत्री पवार यांनी दिला होता. त्यानुसार दर जरूर कमी झाला असला तरी तो राज्यात अजूनही जास्त असल्याने निर्बंध शिथिल होण्याची शक्यता कमी वाटते.
गत आठवड्याशी तुलना
संख्या १४ जूनपर्यंत १७ जूनपर्यंत कमी
पॉझिटिव्हिटी दर (टक्के) : १५.८५ १३.७७ २.८ टक्के
रुग्णसंख्या : ९०६८ ७४४७ १६२१ रुग्ण
ऑक्सिजन बेड वापर (टक्के) ६७.४१ ५४.७८ १२.६३ टक्के
प्रमुख शहरातील पॉझिटिव्हिटी दर असा
रायगड : १२.७७
रत्नागिरी : ११.९०
पुणे - ९.८८
सिंधुदुर्ग : ९.६
सातारा : ८.९१
सांगली : ८.१०
मुंबई : ३.७९
सोलापूर : ३.७३
नागपूर : १.२५
जळगाव-००.९५
नाशिक : ४.३९