कोल्हापूर : राज्याच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी सोमवारी सन २०२५-२०२६ सालाकरिता वार्षिक मूल्यदर (रेडीरेकनर) तक्त जाहीर केले असून कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील रेडीरेकनर दरात ५.०१ टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीबाबत कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांनी स्वागत केले असून त्याचा घरांच्या तसेच जागांच्या किमती वाढण्यावर परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात आले.महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजारमूल्य निश्चित करणे) नियम १९९५ अन्वये दस्त नोंदणीसाठी मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी वार्षिक मूल्यदर तक्ते व मूल्यांकन मार्गदर्शक सूचना नोंदणी महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून प्रतिवर्षी दि. १ एप्रिल रोजी निर्गमित केल्या जातात.यापूर्वी २०१७ -२०१८ साली वार्षिक मूल्यदर तक्ते तयार करण्यात आले होते. त्यानंतर सलग दोन वर्षे स्थावर मिळकत क्षेत्रातील मंदीचा विचार करून (सन २०१८-२०१९ हेच दर कायम ठेवण्यात आले होते.
गेली दोन वर्षे दरवाढ नव्हतीसन २०२०-२०२१ साली कोरोना परिस्थितीमुळे शासनाने दि. १८ मार्च २०२० पासून लागू केलेले निबंधक कार्यालयातील मर्यादित उपस्थिती यामुळे शासनाने पुढील आदेश होईपर्यंत वार्षिक मूल्यदर तक्ते कायम ठेवण्याबाबत कळविले होते. त्या अनुषंगाने काम पूर्ण झाल्यानंतर दि. १२ सप्टेंबर २०२० रोजी सन २०२०-२१ करिता वार्षिक मूल्यदर तक्ते प्रसिध्द करण्यात आले. त्यास शासनाकडून स्थगिती देण्यात आल्याने तेच दर कायम ठेवण्यात आले. गेल्या दोन वर्षात रेडीरेकनरच्या दरात तर वाढच करण्यात आली नव्हती.सन २०२५-२०२५ सालासाठी कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील रेडीरेकनरचे दर ५.०१ टक्क्याने वाढविण्यात आले आहेत. ही वाढ दहा टक्केपर्यंत होईल अशी शंका होती, परंतु प्रत्यक्षात ती कमीच झाली याबाबत बांधकाम व्यावसायिकांतून समाधान व्यक्त केले जात आहेत. या दरवाढीमुळे शहरातील घरांच्या, जागांच्या किमती वाढण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले.