कोल्हापूर, रत्नागिरीचे वर्चस्व कायम

By Admin | Updated: March 9, 2015 23:52 IST2015-03-09T21:09:55+5:302015-03-09T23:52:51+5:30

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : ‘अ’गटात अमरावतीकडून सिंधुदुर्ग पराभूत

Kolhapur, Ratnagiri dominates | कोल्हापूर, रत्नागिरीचे वर्चस्व कायम

कोल्हापूर, रत्नागिरीचे वर्चस्व कायम

पुरळ : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनच्या यजमानपदाखाली जामसंडे सन्मित्र मंडळाच्यावतीने सुरु असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी यांनी पुरुष गटातील कबड्डी संघात तर कोल्हापूर, यवतमाळ, अमरावती, नागपूर या संघांनी महिला गटात आगेकूच केली.
जामसंडे येथील विद्याविकास शाळेच्या पटांगणावर सुरु असलेल्या पुरुषांच्या कबड्डी सामन्यात ‘अ’ गटात मुंबई उपनगरने नंदूरबारचा ४०-१२ असा धुव्वा उडवला. शैलेश गारळे, योगेश सावंत यांच्या चढाया, त्याला मिळालेली अमर निकाते, सुदेश कुळे यांच्या पकडीची साथ यामुळे हे शक्य झाले. ‘ड’ गटात रत्नागिरीने यजमान सिंधुदुर्गला ४०-१७ असे नमविले. मध्यंतराला १७-५ अशी आघाडी घेऊन रत्नागिरीने आपला इरादा स्पष्ट केला होता. भूषण कुळकर्णी, सतीश खांबे यांचा खेळ या विजयात महत्वपूर्ण ठरला. सिंधुदुर्गकडून अनिकेत पारकरची झुंज अपयशी ठरली. याच गटात मुंबई शहरने नागपूरला २२-१० असे पराभूत केले. मध्यंतरापर्यंत अत्यंत चुरशीने चाललेल्या या सामन्यात मुंबईने ८-५ अशी आघाडी घेतली होती. नंतर मात्र जोरदार खेळ करत सामना १२ गुणांनी खिशात टाकला. श्रीभारती यांचा अष्टपैलू खेळ त्याला संकेत सावंतची चढाईची व नितीन विचारेची पकडीची साथ यामुळे मुंबईने हा विजय साकारला.
‘ब’ गटात रायगडने चंद्रपूरचा २६-१४ असा पाडाव केला. मध्यंतरापर्यंत १४-१० अशी रायगडकडे आघाडी होती. राजन तांडेल, अनिकेत पाटील यांच्या चढाया तर अनिकेत कोटेकर याच्या पकडी रायगडच्या विजयात महत्वाच्या ठरल्या. चंद्रपूरच्या निलेश माळवीने एका चढाईत तीन गडी टिपत सामन्यात चुरस आणली. परंतु त्याची ही लढत एकाकी ठरली. महिलांच्या ‘ब’ गटात यवतमाळने औरंगाबादला ३८-१० असे पराभूत केले. सुरुवातीच्या पाच मिनिटांमध्ये यवतमाळने औरंगाबादवर लोन देत मध्यंतरापर्यंत २२-४ अशी आघाडी घेतली होती. यवतमाळकडून अनिता विश्वकर्माने अष्टपैलू खेळ केला. तिने कोपरारक्षक म्हणून छान चवडे काढले. तिला दिव्या शर्माने पकडीत छान साथ दिली. ‘क’ गटात कोल्हापूरने अरुणा सावंत, सारीका हिरकोळी, पूजा पाटील यांच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर वर्ध्याला २३-१५ असे पराभूत केले. वर्ध्याकडून दर्शना वानखेडे, शाहीन सय्यद यांनी छान खेळ केला.
‘अ’ गटात अमरावतीने यजमान सिंधुदुर्गला २२-२० असे नमविले खरे परंतु त्यांना पूर्ण डाव कडवी झुंज द्यावी लागली. मध्यंतराला एका गुणाची आघाडी सिंधुदुर्गकडे होती. परंतु अनुभवी स्वप्ना साखळकरने सामन्यावर नियंत्रण राखत संघाला विजय मिळवून दिला. तिला पूजा पांडेने छान साथ दिली. सिंधुदुर्गच्या स्नेहा टिळवे, मेहराज सय्यद यांची कडवी लढत एकाकी ठरली. (वार्ताहर)


या स्पर्धेत शासनाच्यावतीने उत्कृष्ट खेळाडूसाठी पारितोषिक नसल्याने ठाणे जिल्हा कबड्डीचे अध्यक्ष देवराम भोईर यांनी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट चढाई व पकडीकरीता दोन्ही गटांना प्रत्येकी ५ हजार रुपये पारितोषिक जाहीर केले.

Web Title: Kolhapur, Ratnagiri dominates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.