कोल्हापूर पोलिसांत ‘मागेल त्याला सुटी’
By Admin | Updated: October 22, 2014 23:53 IST2014-10-22T23:10:02+5:302014-10-22T23:53:57+5:30
मिठाईचाही बोनस : तीन हजार पोलिसांना वाटप

कोल्हापूर पोलिसांत ‘मागेल त्याला सुटी’
कोल्हापूर : दोन वर्षांतून पहिलीच दिवाळी कुटुंबांसोबत साजरी करण्याचे भाग्य कोल्हापूर पोलिसांना मिळाले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले. पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच मिठाईबरोबर ‘मागेल त्याला सुटी’ मिळाल्याने पोलीस भारावून गेले आहेत.
टोल आंदोलन, मोर्चे, दंगली यासह लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बंदोबस्तामुळे पोलिसांची दमछाक झाली आहे. गेल्या दोन वर्षांत ऊन, वारा, पावसाचा सामना करत कोणत्याच सणासुदीला त्यांना घराकडे जाता आले नाही. निवडणूक बंदोबस्त संपल्याने या चेहऱ्यांना गावाकडची ओढ लागून राहिली आहे. त्यांच्या या त्यागाची दखल पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी घेत ‘मागेल त्याला सुटी’ तसेच तीन हजार कर्मचाऱ्यांचे तोंड गोड करण्यासाठी मिठाईचे वाटप केले. दिवाळीनिमित्त काही आनंदाचे क्षण कुटुंबासोबत घालवता आल्याने बहुतांशी पोलिसांनी पोलीस कँटिनमधून दिवाळीची खरेदी केली तसेच पोलिसांच्या मुलांसाठी थेट फॅक्टरीमधून फटाके मागवून ते कँटिनमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. येथून फटाक्यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दिवाळीनिमित्त प्रत्येकजण भेटवस्तू देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. त्यानिमित्त डॉ. शर्मा यांनी खात्यातील तीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले. पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच मिठाईचे वाटप झाल्याने सर्वच पोलीस आनंदाने भारावून गेले. लक्ष्मीपुरी, जुना बुधवार पेठ, मुख्यालय, परिसरातील पोलीस वसाहतींमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या घरी पोलीस दिवाळीनिमित्त फराळ जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. (प्रतिनिधी)