कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा --साखर कारखान्यांच्या राजकारणाचाच प्रभाव

By Admin | Updated: October 3, 2014 00:34 IST2014-10-03T00:07:37+5:302014-10-03T00:34:56+5:30

तीन तालुक्यांचा समावेश : पाच कारखान्यांसह १०३ वाड्यांनी व्यापलेला मतदारसंघ

Kolhapur - Panhala with Karveer, Gaganbawda - The effect of the politics of sugar factories | कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा --साखर कारखान्यांच्या राजकारणाचाच प्रभाव

कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा --साखर कारखान्यांच्या राजकारणाचाच प्रभाव

राजाराम लोंढे - कोल्हापूर-- करवीरसह पन्हाळा, गगनबावडा तालुक्यातील १०३ वाड्यांनी हा मतदारसंघ व्यापला आहे. कार्यक्षेत्रातील पाच साखर कारखान्यांच्या सत्तेचे पडसाद या मतदारसंघात उमटत असतात. येथील निकाल हा कारखान्यांच्या राजकारणाभोवतीच फिरत असल्याने काटा लढत पाहावयास मिळते. पुनर्रचनेनंतर करवीरमध्ये दुसरी लढत होत असून, गेले लढतीत पी. एन. पाटील यांचा निसटता पराभव झाला होता; पण पाच वर्षांत अनेक संदर्भ बदलल्याने ही लढत रंगतदार होणार हे निश्चित आहे.
जुन्या करवीर मतदारसंघातील ३४ गावे, जुन्या सांगरूळमधील ६० गावे, पन्हाळ्यातील ६२ गावे व गगनबावडा तालुका असा करवीर मतदारसंघ २००९ला तयार झाला. या मतदारसंघात ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘राजाराम’, ‘डॉ. डी. वाय. पाटील’ व ‘ दत्त-आसुर्ले’ या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र येते. चंद्रदीप नरके, पी. एन. पाटील, संपतराव पवार, विनय कोरे, सतेज पाटील, पी. जी. शिंदे, महादेवराव महाडिक, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांना मानणारे गट कार्यरत आहेत. पुनर्रचनेनंतर झालेल्या पहिल्याच २००९ च्या निवडणुकीत येथे चंद्रदीप नरके व पी. एन. पाटील यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीने घेतलेली दुटप्पी भूमिका, नरके यांनी तीन वर्षे घेतलेली मेहनत व पाटील यांनी फारशी गांभीर्याने न घेतलेली निवडणूक या सर्व कारणाने नरकेंनी बाजी मारली. यावेळी पाटील व नरके यांच्याबरोबर जनसुराज्य-शेकापचे राजू सूर्यवंशी यांनी दंड थोपटले आहेत.
सध्या राष्ट्रवादीने सूर्यवंशी यांना पाठिंबा दिला असला तरी हा पाठिंबा देताना मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्याला विश्वासात घेतले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीत दोन्ही कॉँग्रेसने एकत्रित येत धनंजय महाडिक यांना ३३ हजारांचे मताधिक्य दिले होते. दोन्ही कॉँग्रेसबरोबर ‘गोकुळ’चे संचालक अरुण नरके सोबत होते. आता सर्वच समीकरणे बदलल्याने निवडणुकीतील रंगत वाढली आहे.
करवीर तालुक्यातील बहुतांश गावे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे या गावांच्या फारशा अपेक्षाही नसतात. येथील मतदान हे स्थानिक राजकारण व गटातंर्गतच होत असते. शहरालगतची गावे असल्याने करवीरमध्ये शक्यतो बेरोजगारीचा प्रश्न दिसत नाही; पण गगनबावडा तालुक्यात डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना सोडला, तर एकही नवीन प्रकल्प उभा राहिला नसल्याने बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. अजूनही येथील शेतकरी पारंपरिक शेतीवरच अवलंबून आहे. पाच वर्षांत रस्ते, पाणीपुरवठा याचे प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागलेले आहेत.
अनेक वाड्या-वस्त्यांवर अजूनही पाणी व रस्त्यांसारखे मूलभूत प्रश्न भेडसावत आहेत. पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला धामणी प्रकल्प गेले अनेक वर्षे रेंगाळलेला आहे. गेल्या निवडणुकीत तिन्ही उमेदवारांच्या अजेंठ्यावर धामणी प्रकल्प होता; पण त्याचा फारसा पाठपुरावा झालेला दिसत नाही.

जिल्हा परिषद बलाबल
विमल पाटील, शशिकला रोटे, शांताबाई कांबळे (कॉँग्रेस-‘पी. एन.’समर्थक), विलास पाटील, एस. आर. पाटील, बाजीराव पाटील, सुजाता पाटील (शिवसेना), मानसिंग पाटील (जनसुराज्य), मेघाराणी जाधव (राष्ट्रवादी), प्रिया वरेकर (काँग्रेस-सतेज पाटील समर्थक) व बाजारभोगाव पंचायत समिती मतदारसंघ - सुवर्णा पाटील (शिवसेना).
पंचायत समितीची सत्ता - करवीर- कॉँग्रेस, गगनबावडा-काँग्रेस (सतेज पाटील गट)
सहकारात काँग्रेसचा दबदबा
करवीर मतदारसंघातील बहुतांश ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आहेत. विकास सेवा संस्था, दूध संस्था, पाणीपुरवठा व पतसंस्थांवर निर्विवाद पी. एन. पाटील यांच्या गटांचे वर्चस्व आहे.


‘गोकुळ’ संचालक
अरुण नरके (शिवसेना), विश्वास पाटील, सुरेश पाटील, निवास पाटील (कॉँग्रेस-‘पी. एन.’ समर्थक), बाबासाहेब चौगुले (कॉँग्रेस-सतेज पाटील समर्थक).

बँका/कारखाने
कुंभी बँक - चंद्रदीप नरके गट, यशवंत बँक - पी. एन. पाटील समर्थक.
साखर कारखाने-
भोगावती - राष्ट्रवादी काँग्रेस
कुंभी - शिवसेना
डी. वाय. पाटील - काँग्रेस
दत्त-आसुर्ले - दालमिया शुगर्स
राजाराम - काँग्रेस

विधानसभा मतदारसंघ क्रमांक २७५
एकूण मतदारसंघ २ लाख ८८ हजार १७५
जुना करवीर ९१ हजार ४९१
जुना सांगरुळ १ लाख ४ हजार ५५७
पन्हाळा६४ हजार ७९६
गगनबावडा २४ हजार ९४१
महिला मतदार १ लाख ३५ हजार ९६६
पुरुष मतदार १ लाख ५१ हजार ४९२
इतर १
सर्व्हिस मतदार (महिला)२०८
सर्व्हिस मतदार (पुरुष)४८७

 

निर्णायक मतांची गावे
वडणगे१०२१०
वाकरे ४४०७
शिंगणापूर४२९५
खुपिरे ४८८४
प्रयाग चिखली४५१६
शिये ६२५४
निगवे दुमाला४७२२
बालिंगा ३८९४
सांगरुळ६६२२
कसबा बीड ३०८९
शिरोली दुमाला४२८१
वाशी३८४४
म्हाळुंगे ३३२३
गगनबावडा१४७७
यवलूज४५८०
पडळ २९५८
माजनाळ २२१३

Web Title: Kolhapur - Panhala with Karveer, Gaganbawda - The effect of the politics of sugar factories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.