कोल्हापूर पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्ष नको

By Admin | Updated: August 27, 2014 00:18 IST2014-08-27T00:01:28+5:302014-08-27T00:18:16+5:30

मुख्यमंत्र्यांचा सल्ला : मुबलक आहे म्हणून पाणी कसेही वापरू नका

Kolhapur Panchaganga pollution is not neglected | कोल्हापूर पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्ष नको

कोल्हापूर पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्ष नको

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेमुळे २०४५ साली असणाऱ्या ११ लाख लोकसंख्येला मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठा होईल. या योजनेमुळे जिल्ह्याच्या पर्यटन व उद्योगावर सकारात्मक परिणाम होणार आहे. शहराचा स्वच्छ पाण्याचा प्रश्न मिटला म्हणून पंचगंगा प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, असे आदेश आज, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला दिले. ४८९ कोटींच्या या योजनेतून मिळणारे पाणी मोफत असणार नाही, यासाठी काही किंमत ही मोजावीच लागेल, असेही स्पष्टीकरण चव्हाण यांनी केले. पुईखडी येथे झालेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या भूमिपूजन सभारंभात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, दूषित पाण्यापासून शहरवासीयांची सुटका करण्यासाठीच योजनेला मंजुरी दिली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे. वैश्विक तापमान या आता पुस्तकातील गोष्टी राहिलेल्या नाहीत.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, दोन वर्षांत अत्यंत पारदर्शकपणे योजना पूर्ण करू. टोल हा चारचाकी वाहनांपुरता मर्यादित विषय आहे. टोल प्रश्नामुळे पाच लाख जनतेला मुबलक पाणी देणाऱ्या योजनेचा प्रारंभ होताना गाव बंद ठेवणे योग्य नाही.
जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाणी हा गरिबांशी निगडीत असणारा विषय आहे. योजनेच्या भूमिपूजनावेळी शहरात गुढ्या उभारून आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. मात्र, कोल्हापूर बंदमुळे मन व्यथित झाले. रस्ते प्रकल्प राबविताना काही चुका झाल्या हे मान्य, मात्र टोलचे हे भूत उतरावेच लागेल.
योजनेचे उद्घाटनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व्हावे, मात्र तत्पूर्वी शहराला घेराव घातलेल्या काही प्रश्नांची जाणीवपूर्वक सोडवणूक करावी लागेल, अशी सूचना श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केली. केंद्र शासन अनेक योजना रद्द करीत आहे. आम्ही केलेली विकासकामे व निधीची आठवण येत्या काळात होणाऱ्या निवडणुकीत ठेवा, असे आवाहन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.प्रास्ताविक महापौर तृप्ती माळवी यांनी केले. आभार स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांनी मानले. जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे, उपमहापौर मोहन गोंजारे, माजी आमदार मालोजीराजे, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
भाषणातही श्रेयवाद
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पाईपलाईन योजना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्यामुळेच मार्गी लागल्याचे वारंवार सांगितले. योजना मार्गी लावण्यात ‘बाबां’चा सिंहाचा वाटा आहे, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्री चव्हाण यांनी सतेज पाटील यांनी योजनेसाठी राजकीय कारकीर्द पणाला लावली. योजना मार्गी लावण्यात त्यांचा पाठपुरावाच उपयोगी ठरल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीत खिंड लढवित जलसंपदामंत्री मुश्रीफ यांनी सासने मैदानावरील सत्कारास उत्तर देताना अजित पवार यांनी ‘थेट पाईपलाईन योजना मार्गी लावली नाही, तर ‘पवारांची औलाद सांगणार नाही’ असे सांगितल्याची आठवण करून दिली. योजना मार्गी लावण्यात शरद पवार व अजित पवार यांनीही पाठपुरावा केला. तसेच मीही माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांना भेटल्याचे सांगितले. नेत्यांच्या भाषणातून योजनेचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नांची कार्यक्रमस्थळी चर्चा सुरू होती.

‘बाबांचा सिंहाचा वाटा’
जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत थेट पाईपलाईन हा सर्वच राजकीय पक्षांचा जाहीरनामा असायचा. हीच थेट पाईपलाईन योजना मार्गी लावण्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कारणीभूत आहेत. यामध्ये ‘बाबां’चा सिंहाचा वाटा आहे. योजनेच्या भूमिपूजनापूर्वी सहा महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या खात्यावर १९१ कोटी रुपयांचा निधी वर्ग झाला आहे. १२२५ कोटी रुपयांच्या योजना केंद्र शासनाने रद्द केल्या. निविदा प्रक्रिया राबविल्यानेच ही योजना मार्गी लागली. योजना ३० महिन्यांऐवजी २४ महिन्यांत पूर्ण करू.
- सतेज पाटील, गृहराज्यमंत्री .

आंदोलन ही धोक्याची घंटा
कोल्हापूरचे वातावरण बिघडत आहे. योजनेत उणिवा काढून आंदोलन उभे करण्याचे पेव फुटत आहे. चांगल्या योजना आणताना याचा परिणाम होत आहे. याची दक्षता भविष्यात घ्यावी लागणार आहे. गरिबांना मिळणारे पाणी थांबविण्याचा काहींचा सुरू असलेला उद्योग त्यांनी थांबवावा, योजना सक्षमपणे राबविण्यास आम्ही समर्थ आहे, असा सज्जड दम गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी दिला.

Web Title: Kolhapur Panchaganga pollution is not neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.