‘कोल्हापूर उत्तर’ला योग्य ‘उत्तर’ मिळेना!
By Admin | Updated: September 2, 2014 00:30 IST2014-09-02T00:24:34+5:302014-09-02T00:30:42+5:30
विधानसभा निवडणूक : भाकपकडून रघुनाथ कांबळे निश्चित पण पानसरेंसाठी सर्वांचा आग्रह

‘कोल्हापूर उत्तर’ला योग्य ‘उत्तर’ मिळेना!
कोल्हापूर : कोल्हापूर ‘उत्तर’च्या जागेवर कॉँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीनेही दावा केल्याने येथील ‘उत्तर’ च्या उमेदवारीचा गुंता वाढला आहे. आज, सोमवारी झालेल्या घरेलु कामगारांच्या मेळाव्यात कॉँग्रेसकडून प्रल्हाद चव्हाण यांचे नाव पुढे करण्यात आले तर नगरसेवकांनी बैठक घेवून उत्तरमधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली. तर उत्तर मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांनी पक्षाचे शहर सचिव रघुनाथ कांबळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे.
कांबळे यांच्या नावाची अधिकृत घोषणा शुक्रवारी (दि ५ सप्टेंबर) होणाऱ्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत होणार आहे. मात्र असे असले तरी ही निवडणूक गोविंद पानसारे यांनी लढवावी, असा आग्रह पक्षातील कार्यकर्त्यांकडून व सामजिक संस्थाकडून होत आहे. परंतु पानसरे मात्र त्यास नम्रपणे नकार देत आहेत. शिरोळमधून सा. रे. पाटील ८८ वय असतानाही पुन्हा निवडणूक लढवायला इच्छुक आहेत, मग तुम्ही का नाही, अशीही विचारणा त्यांना होत आहे. त्यामुळे या वेळेला स्वत: पानसरे यांनीच रिंगणात उतरावे, असा त्यांना मानणाऱ्या शहरातील अनेक मान्यवरांचा आग्रह होता. माझे वय सध्या ८१ आहे. मी तीनवेळा यापूर्वी निवडणूक लढवली आहे. त्यामुळे आपण आता पुन्हा त्या वाटेने जाणार नाही, असा त्यांचा निश्चय आहे. पक्षांतून मेघा पानसरे व रघुनाथ कांबळे यांची नावे चर्चेत आली होती. त्यातून कांबळे यांचे नाव निश्चित झाले आहे.
रघुनाथ कांबळे हे मूळचे करवीर तालुक्यातील आडूरचे आहेत. गेली सत्तावीस वर्षे ते पक्षाचे लढाऊ कार्यकर्ते आहेत. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे ते राज्य उपाध्यक्ष आहेत. फेरीवाला, मोलकरीण, शेतमजूर, वनकामगार, आरोग्य परिचर, रेशन धान्य कृती समिती अशा सर्वसामान्यांच्या लढ्यात ते अग्रभागी राहिले आहेत. गेली एकतीस वर्षे भल्या पहाटे लोकांना वृत्तपत्र टाकणारा मुलगा आता विधानसभेला नशीब आजमावत आहे.
आर. के. पोवारांना ‘उत्तर’ची उमेदवारी द्या : नगरसेवकांची मागणी
उत्तर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात यावा, याठिकाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के . पोवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आज, सोमवारी महापौैर तृप्ती माळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत करण्यात आली. आर. के. पोवार यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची येत्या ९ किंवा ११ सप्टेंबरला भेट घेण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक आदिल फरास यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. बैठकीत राष्ट्रवादी, जनसुराज्य व काही अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. आर. के. पोवार यांच्या उमेदवारीवर सर्वच नगरसेवकांनी एकमताने पसंती दिली. यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, गट नेता राजेश लाटकर, माजी महापौर कादंबरी कवाळे आदींसह नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉँग्रेस केद्र व राज्य सनियंत्रण समितीतर्फे प्रल्हाद चव्हाणांचे नाव पुढे
गेल्या चार दशकात काँग्रेस पक्षासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांना पक्षाने येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी द्यावी, अशी केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समितीने एकमुखी मागणी केली असल्याचे शहर उपाध्यक्ष किरण मेथे यांनी आज, सोमवारी घरेलू कामगार महिलांना सन्मानधनाच्या धनादेश वाटप कार्यक्रमात सांगितले. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला उपाध्यक्षा सरलाताई पाटील, सनियंत्रण समिती शहर अध्यक्ष चंदा बेलेकर प्रमुख उपस्थित होत्या. उपाध्यक्ष मेथे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेस सरकार कटिबद्ध आहे. येत्या निवडणुकीसाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे पक्षातील गेल्या चार दशकातील योगदान लक्षात घेऊन त्यांना पक्षाने उमेदवारी द्यावी.