Kolhapur News : कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एसटी चालकास पोलिस व त्याच्या पत्नीने दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी आसिफ महम्मद कलायगार आणि त्यांची पत्नी हाफिबा आसिफ कलायगार यांच्याविरोधात कोडोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही घटना रविवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास रत्नागिरी महामार्गावरील नावली येथे घडली.
मिळालेली माहिती अशी, मलकापूर आगाराची बस (एमएच ११ टी ९२८७) ही बस घेऊन चालक नितीन शिरागावकर कोल्हापुरातून मलकापूरकडे जात होता. यावेळी कलायगार हे पत्नीसह चारचाकी गाडीतून मलकापूरच्या दिशेने जात होते. यावेळी वाघबीळ पासून एसटी बसचालक पुढे जाण्यासाठी प्रयत्न करीत होते, पण त्यांना पुढे जाण्यासाठी संधी कलायदार यांनी दिली नाही.
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
पुढे नावली या गावाजवळ रस्ता रुंद होता यावेळी बस पुढे घेतली. यावेळी बसचालकाने साईड द्यायची नाही का असे कलायदार यांना विचारले. यावेळी कलायदार दाम्पत्याने बसचालकास शिवीगाळ आणि दमदाटी करीत मारहाण केली. यावेळी कलायदार यांनी मी पोलीस असून तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.
यावेळी लोकांची गर्दी जमली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये कलायदार दाम्पत्य बसचालकावर अरेरावी करीत असल्याचे दिसत आहे. या प्रकरणी कोडोली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी बसचालकाने केली होती. काल रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.