कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला तरी अद्ययावत मतदार यादी तयार करणे, प्रभाग रचना निश्चित करणे, आरक्षणाची सोडत काढणे, या सर्व प्रक्रियेमुळे प्रत्यक्षात निवडणूक पावसाळ्यानंतरच होईल, असा अंदाज महापालिका अधिकाऱ्यांचा आहे. निवडणुकीचा मार्ग रिकामा झाल्याने इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.महापालिका सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर २०२० मध्ये संपली. त्यानंतर निवडणुका न झाल्याने प्रशासकराज सुरू आहे. यापूर्वी तीन वेळा प्रत्यक्षात निवडणुकीची प्रक्रिया राबवल्यानंतर इच्छुकांनी जोरदार तयारी केली. मात्र, तिन्ही वेळा निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन मतदान झाले नसल्याने तयारीवर पाणी फिरले. खर्च करून केलेली तयारी वाया गेल्याची भावना इच्छुकांमध्ये निर्माण झाली. मात्र, आता सर्वाेच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक तयारीच्या लगीनघाईला सुरुवात होणार आहे.दरम्यान, एक सदस्य की बहुसदस्य प्रभाग पद्धतीने होणार, यावरून निवडणुकीतील लढत पक्षीय पातळीवर होणार की आघाडी करून, हे ठरणार आहे; पण दीर्घकाळ निवडणूक नसल्याने आणि पक्षांची संख्या, इच्छुकांची संख्याही वाढली आहे. परिणामी, यावेळची महापालिका निवडणुकीसंबंधीची उत्सुकता वाढली आहे.
पाऊस, गणेशोत्सवनिवडणूक प्रक्रियेसाठी मोठी यंत्रणा लागते. ही यंत्रणा पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यात तर गणपतीमध्ये कायदा, सुव्यवस्था राखण्यामध्ये पूर्णपणे व्यस्त असते. म्हणून पावसाळा, गणपती झाल्यानंतरच मतदान होईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी तीन वेळा प्रक्रिया; पण..सभागृहाची मुदत संपल्यानंतर २०२० मध्ये एक सदस्य आणि ८१ प्रभागानुसार पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा २०२१ मध्ये ओबीसी आरक्षण वगळून प्रभागरचना झाली. जुलै २०२२ मध्ये शेवटची तिसरी प्रभाग रचना ३० प्रभागात प्रत्येकी तीन आणि एका प्रभागात दोन याप्रमाणे झाली. त्यानंतर मध्यतंरी एकदा निवडणुकीसाठी तयार राहा, असे पत्र आले होते; पण पुढे राज्य निवडणूक आयोगाकडून काहीही कार्यवाही न झाल्याने महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या हालचाली थंड होत्या.
महापालिका आधी की जिल्हा परिषद?राज्यातील मुदत संपलेल्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठीचे मनुष्यबळ, मतदान यंत्र सामग्रीची जुळणी करणे अवघड असते. म्हणून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका यातील कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी होणार, यावरून महापालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार, हे स्पष्ट होणार आहे.
मावळत्या सभागृहातील बलाबल
- काँग्रेस - ३३
- राष्ट्रवादी - ११
- शिवसेना - ४
- ताराराणी आघाडी - १९
- भाजप - १४
- एकूण जागा - ८१
मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत तरी निवडणूक प्रक्रियेसंबंधी राज्य निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारच्या लेखी सूचना, आदेश आलेले नव्हते. आदेश येताच महापालिका प्रशासनाकडून तयारीला सुरुवात होईल. - राहुल रोकडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, कोल्हापूर