कोल्हापूरची आमदारकी पन्नाशीच्या आत..!

By Admin | Updated: October 22, 2014 00:25 IST2014-10-21T23:59:11+5:302014-10-22T00:25:06+5:30

प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून शिवसेना नेहमीच नव्या दमाच्या उमेदवारांना निवडणुकीस उभे करीत आली आहे.

Kolhapur MLAs within fifty ..! | कोल्हापूरची आमदारकी पन्नाशीच्या आत..!

कोल्हापूरची आमदारकी पन्नाशीच्या आत..!

विश्वास पाटील - कोल्हापूरची आमदारकी वयाने सरासरी पन्नाशीच्या आत आली आहे. दहापैकी तब्बल सात आमदार वयाने पन्नासच्या आतील असल्याचे चित्र आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर व हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचेच आमदार साठी ओलांडलेले आहेत. भाजपचे सुरेश हाळवणकर यांनी नुकतीच पन्नाशी पूर्ण केली आहे. प्रत्येक मतदारसंघातील पस्तीस वयाच्या आतील मतदारांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पक्षांचाही तरुण उमेदवारांना संधी देण्याकडे कल आहे. त्यातही कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार जास्त निवडून आल्याने सरासरी वय कमी झाले आहे; कारण प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारून शिवसेना नेहमीच नव्या दमाच्या उमेदवारांना निवडणुकीस उभे करीत आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राज्यभरातील उमेदवारांचे वयही अन्य सर्व पक्षांच्या उमेदवारांपेक्षा कमी आहे.
जिल्ह्यात आतापर्यंतच्या राजकारणात काँग्रेसचा पगडा होता. काँग्रेसमध्ये प्रस्थापितांचे राजकारण आजही चालते. त्यामुळे त्याच-त्याच उमेदवारांना पुन:पुन्हा उमेदवारी हा त्या पक्षात पारंपरिक हक्कच मानला जातो. या निवडणुकीतही सा. रे. पाटील, भरमू पाटील, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, जयवंतराव आवळे अशी नावे पाहिल्यास हे लक्षात येते. नऊपैकी कर्णसिंह गायकवाड, सतेज पाटील व सत्यजित कदम हेच काँग्रेसचे नव्या दमाचे उमेदवार होते. अन्य वयाने ज्येष्ठ आहेत. आतापर्यंत उमेदवार कोण यापेक्षा पक्ष म्हणून काँग्रेसचे वर्चस्व राहिल्याने वयाने जास्त असलेले उमेदवार आमदार होत आले. ही परंपरा मुख्यत: शिवसेनेने मोडून काढली. फारशी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, परंतु नव्या दमाच्या उमेदवारास रिंगणात उतरवून हवा तयार करण्यात या पक्षाचा हातखंडा. मागच्या दहा वर्षांत तर ‘गळ्यात भगवी फडकी घालून गावातील चार पोरं शिवसेनेसाठी फिरतात,’ अशी हेटाळणी काँग्रेसवाले करीत असत. त्यात या पोरांनीच कोल्हापूरसह महाराष्ट्रातही दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांच्या तोंडाला फेस आणल्याचे विधानसभेचा निकाल सांगतो आहे. आता काँग्रेस व राष्ट्रवादीही त्यापासून काही धडा घेते का, हेच पाहायचे...!

तरुणाईची मतदारसंख्या अशी...
कोल्हापूर जिल्ह्यात ३१ जुलैअखेर प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार २९ लाख ५ हजार मतदार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक सहा लाख ५१ हजार ३५ मतदार हे ३० ते ३९ वयोगटातील आहेत. त्याखालोखाल ४० ते ४९ वयोगटातील ६ लाख १२ हजार ८९२, तर २० ते २९ वयोगटातील जिल्ह्यात ५ लाख ७० हजार मतदार आहेत, तर प्रथमच मतदार करणारे (१८ ते १९) या वयोगटातील ५७ हजार १८५ मतदार आहेत. याचा अर्थ असा की, जिल्ह्यात १८ ते ४९ वयोगटातील १८ लाख ९१ हजार ३७८ मतदार आहेत. मतदार तरुण झाल्याने नाइलाजाने का असेना, तरुणांना उमेदवारी देण्याकडे कल वाढतो आहे, हेदेखील सुचिन्हच म्हटले पाहिजे.

Web Title: Kolhapur MLAs within fifty ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.