कोल्हापूर - कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशामध्ये महाराष्ट्र राज्य सातत्याने पहिल्या क्रमांकावर असून महाराष्ट्रात जिल्हानिहाय लसीकरणामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 13 लाख 30 हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून जिल्ह्यामध्ये लस वाया जाण्याचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याचे सांगतानाच संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
जिल्ह्यात 30 जुनपर्यंत एकूण 13 लाख 30 हजार 226 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये 45 वर्षावरील 8 लाख 82 हजार 245 नागरिकांना पहिला डोस तर 2 लाख 15 हजार 620 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 45 वर्षे व त्यावरील लाभार्थ्यांची अपेक्षित लोकसंख्या 12.74 लक्ष आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसचे एकूण 10.98 लाख लसीकरण झालेले आहे. कोल्हापूर जिल्हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सातत्याने प्रथम क्रमांकावर असल्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या लसीकरणाला वेग देतानाच, लस वाया जाणार नाही याची देखील दक्षता यंत्रणेकडून घेतली जात आहे. 30 जुन रोजीच्या कोविन पोर्टलवरील अहवालानुसार कोल्हापूर जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण उणे 0.73 इतके अल्प असल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याचेही राज्यमंत्री पाटील म्हणाले.