जहाँगीर आर्टमध्ये यंदाचा कोल्हापूर कलामहोत्सव
By Admin | Updated: December 31, 2014 23:56 IST2014-12-31T23:40:06+5:302014-12-31T23:56:07+5:30
विस्तारते क्षितीज : ५०० चित्रे, १०० शिल्प कलाकृतीचे प्रदर्शन, आठ दिवसीय आयोजन

जहाँगीर आर्टमध्ये यंदाचा कोल्हापूर कलामहोत्सव
इंदुमती गणेश -कोल्हापूरला लाभलेली चित्र-शिल्प परंपरा व येथील कलाकृतींना भूक्षेत्राच्या मर्यादेपलीकडे घेवून जात त्यांचा लौकिक देश-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी यंदाचा म्हणजेच २०१५ सालचा कलामहोत्सव मुंबईच्या ‘जहाँगीर आर्ट गॅलरी’मध्ये होणार आहे. आपल्या कलाकृतींचे एक तरी प्रदर्शन जहाँगीरमध्ये व्हावे असे स्वप्न मनी असलेल्या प्रत्येक कलाकारांसाठी ही अत्यंत आनंददायी वार्ता आहे. कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्यावतीने देण्यात आलेल्या महोत्सवाच्या प्रस्तावाला जहाँगीरच्या विश्वस्तांनी होकार दिला आहे.
‘कलानगरी’ म्हणून बिरूदावली असलेल्या कोल्हापुरात चित्र-शिल्पकलेचा फार मोठी परंपरा लाभली आहे. किंबहुना चित्रपटसृष्टीतील कित्येक कलावंत आधी चित्र-शिल्पकार होते. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यापासूनची ही वाहती गंगा आजतागायत कॅ़नव्हासवर उमटलेल्या इंद्रधनूच्या रूपाने रसिकांना सुंदर कलाकृतींचा आस्वाद देत आहे. मात्र, त्याकाळी साधनांचा अभाव म्हणा किंवा कलाकारांमध्ये नसलेला व्यावसायिक दृष्टिकोन यामुळे या कलाकृती कोल्हापूरच्या बाहेर आपला लौकिक पोहोचवू शकली नाही. आता दळणवळणाची साधने आणि सोशल मीडियामुळे कलाकृती अन्य देशांत जात असल्या तरी त्याचे स्वरूप मर्यादित आहे आणि त्यातून कोल्हापूरला लाभलेले हे वैभव प्रतिबिंबित होत नाही.
ही उणीव भरून काढत गेल्या दोन वर्षांपासून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्यावतीने कलामहोत्सवाचे आयोजन केले जाते. पाच दिवस भरणाऱ्या या महोत्सवामुळे येथील चित्र-शिल्प कलाकृतींना व्यासपीठ मिळाले. मात्र, हा महोत्सव कोल्हापुरातच होत असल्याने अन्य शहरातील रसिकांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे आर्ट फौंडेशनने यंदा हा कलामहोत्सव मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत करण्याचे ठरवले असून त्याची प्राथमिक बोलणी ‘जहाँगीर’च्या विश्वस्तांशी झालेली आहे.
महोत्सवाचे स्वरुप प्रदर्शनाचे
कोल्हापूर आर्ट फौंडेशनच्यावतीने केला जाणारा उपक्रम कलामहोत्सवाच्या नावाने ओळखला जातो त्याअंतर्गत विविध कार्यक्रमही ठेवले जातात मात्र जहाँगीरमध्ये महोत्सवाला परवानगी नाही. त्यामुळे कोल्हापूकरांसाठीच्या कलामहोत्सवाचे स्वरुप जहाँगीरमध्ये प्रदर्शनाच्या रूपात असणार आहे. त्यासाठी पूर्ण आर्ट गॅलरी आठ दिवसांसाठी बुक करण्यात येणार आहे. येथील पाचही दालनात मिळून पाचशे चित्रे आणि शंभर शिल्प मांडण्यात येणार आहेत.
कलाकृतींची निवड समितीकडून
आर्ट फौंडेशनने दिलेल्या कलामहोत्सवाच्या प्रस्तावाला जहाँगीरच्या विश्वस्तांनी होकार दिला आहे. त्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक कलाकाराच्या किमान चार कलाकृतींचे छायाचित्र आणि कलाकाराचा बायोडाटा आर्ट फौंडेशनच्यावतीने पाठविण्यात येणार आहे. जहाँगीरच्या निवड समितीने निवडलेल्या कलाकृतीच जहाँगीरमध्ये प्रदर्शनासाठी मांडल्या जातील. या प्रदर्शनास सहभागी होण्यासाठी कलाकारांनी आपल्या कलाकृती व बायोडाटा आर्ट फौंडेशनकडे पाठवाव्यात, असे आवाहन समन्वयक प्रशांत जाधव यांनी केले आहे.
कलामहोत्सवामुळे चित्र-शिल्पकलेला पुन्हा महत्त्व आले आहे. नवीपिढी याकडे करिअरच्या दृष्टीने पाहते. कोल्हापूरची ही परंपरा अन्य शहरांमध्ये पोहोचवणे वकलाकृतीचे क्षितीज विस्तारण्यासाठी जहाँगीरमधील या महोत्सवाला विशेष महत्त्व आहे. - प्राचार्य अजय दळवी (उपाध्यक्ष, कोल्हापूर आर्ट फौंडेशन)