कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

By Admin | Updated: December 9, 2014 23:52 IST2014-12-09T23:35:37+5:302014-12-09T23:52:46+5:30

२० डिसेंबरपासून : देश-विदेशांतील ५० चित्रपट, ४० लघुपटांचा समावेश

Kolhapur International Film Festival | कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

कोल्हापूर : चित्रपटनिर्मितीचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात रसिकांना देश-विदेशांतील चित्रपटांचा आस्वाद देणारा तिसरा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (किफ) शनिवार,
दि. २० पासून सुरू होत असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने शाहू स्मारक भवनमध्ये २७ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात यंदा देश-विदेशांतील एकूण ५० चित्रपट व ४० लघुपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवांतर्गत चित्रपटक्षेत्रात दीर्घकाल योगदान दिलेल्या दिग्दर्शकास कलामहर्षी सिनेमाकेसरी बाबूराव पेंटर स्मृती पुरस्कार व चित्र- तंत्र विज्ञानातील दीर्घकालीन योगदानासाठी ‘चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे.
‘कंट्री फोकस’मध्ये चीनमधील सन २०१३ साली प्रदर्शित झालेले सात चित्रपट यासह इराण, कोरिया, फ्रान्स, तैवान, इस्रायल, ब्राझील, इटालियन, यूके अशा विविध देशांतील चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. लेखक, शायर गुलजार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्याही काही चित्रपटांचे प्रदर्शन या महोत्सवात केले जाणार आहे.
‘माय मराठी’ विभागात सात नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार असून त्यांतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची निवड प्रेक्षकांच्या पसंतीने केली जाईल. महोत्सवासाठी प्रेक्षकांची सभासद नोंदणी १० तारखेपासून सुरू होत आहे. जुन्या देवल क्लबजवळील आपटे बिल्डिंग येथे दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत ही नोंदणी केली जाईल. तरी नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी दिलीप बापट, सुभाष भुरके उपस्थित होते.

Web Title: Kolhapur International Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.