कोल्हापूर --वीस हजारांवर मूर्ती दान!

By Admin | Updated: September 5, 2014 00:46 IST2014-09-05T00:45:48+5:302014-09-05T00:46:04+5:30

पर्यावरणपूरक उत्सव : पावसाच्या सरी झेलत घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन

Kolhapur - image donations to twenty-six thousand rupees! | कोल्हापूर --वीस हजारांवर मूर्ती दान!

कोल्हापूर --वीस हजारांवर मूर्ती दान!

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’चा गजर... चिरमुऱ्यांची उधळण, वाद्यांच्या निनादात भाविकांनी जड अंत:करणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. सकाळपासून कोसळत असलेल्या पावसाच्या सरी झेलतानाच जल प्रदूषणविरोधात विधायक पाऊल उचलत कोल्हापूरकरांनी स्वयंस्फूर्तीने मूर्तींचे काहिलीत विसर्जन केले.
पर्यावरणप्रेमी, महापालिका आणि स्वयंसेवी व्यक्ती, संस्था यांनी केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा जागर करीत इराणी खण आणि तांबट कमान येथील विसर्जन कुंडात मोठ्या संख्येने गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या. याशिवाय शहरात २० हजारांहून अधिक गणेशमूर्ती आणि ३० टनांहून अधिक निर्माल्यदान करण्यात आले. गेल्यावर्षी सात हजार मूर्ती दान करण्यात आल्या होत्या. यंदा तिप्पट मूर्तिदान झाले आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा कोसळत असलेल़्या पावसाने नेमका आज, गुरुवारी जोर धरला. कधी कडकडीत ऊन, तर अचानक ढग दाटून पडणाऱ्या सरी असा ऊन-पावसाचा खेळच सुरू होता. विसर्जनासाठी दुपारपर्यंत भाविकांची संख्या तशी कमीच होती. दुपारी चारनंतर मात्र पावसाने उघडीप न दिल्याने पावसाच्या सरी झेलतच भाविक मोठ्यासंख्येने विसर्जनासाठी बाहेर पडले.
पावसापासून गणेशमूर्तींचे रक्षण करत पंचगंगा नदीकाठावर मूर्ती विसर्जनासाठी नागरिक येत होते. दुपारी चारनंतर गर्दीचा ओघ वाढला. प्रदूषणाची उच्चांकी पातळी गाठलेल्या पंचगंगा नदीच्या संरक्षणासाठी कोल्हापूरकर पुढे सरसावले आणि स्वयंस्फूर्तीने गणेशमूर्तींचे दान केले. याशिवाय रंकाळा तलाव, तांबट कमान याठिकाणीही भाविकांनी मोेठ्या संख्येने गणेशमूर्ती दान केल्या. /पान ४ वर

महापालिका किती क्रियाशील
पंचगंगा काठावर महापालिकेच्यावतीने तीन काहिली ठेवण्यात आल्या होत्या. श्रीराम फौंड्रीच्यावतीने मूर्तींसाठी मांडव घालण्यात आला होता. महावीर कॉलेज व न्यू कॉलेजचे विद्यार्थी नागरिकांना मूर्तिदान करण्याचे आवाहन करीत होते. दान झालेल्या मूर्ती घेणे, त्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत व्यवस्थित ठेवणे ही सगळी कामे पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्थांच्यावतीने केली जात होती. बरेच भाविक मूर्तीसोबत प्लास्टिकच्या पिशवीसह निर्माल्यदेखील पंचगंगेच्या पात्रात टाकत होते. त्यांना रोखण्यासाठी कोणतीच यंत्रणा येथे नव्हती. महापालिकेने माईकवरून आवाहन केले असते किंवा कर्मचारी तैनात केले असते, तर हा प्रकार घडला नसता.

काहिलीत विसर्जित मूर्तींची संख्या
कळंबा तलाव : ७०००
रंकाळा : ३५००
राजाराम बंधारा : ३०००
राजाराम तलाव : २८००
पंचगंगा घाट : २४००
कोटितीर्थ : ११००



न्यू पॅलेसची
गणेशमूर्ती दान
पुरोगामी आणि विधायक परंपरेची सुरुवात नेहमीच छत्रपती घराण्याकडून झाली आहे. न्यू पॅलेसमध्ये प्रतिष्ठापना केलेली गणेशमूर्ती सायंकाळी सहाच्या दरम्यान पालखीतून पंचगंगा काठावर आली. घराण्याच्या मानकऱ्यांनी मूर्ती काहिलीत विसर्जित करून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त केली.

Web Title: Kolhapur - image donations to twenty-six thousand rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.