नियोजनबद्ध उपक्रमामुळे ‘कोल्हापूर’ आदर्श
By Admin | Updated: April 17, 2015 00:06 IST2015-04-16T23:57:34+5:302015-04-17T00:06:03+5:30
राज्यात झेंडा : ‘कायापालट’चा झाला आहे शासन निर्णय; नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल

नियोजनबद्ध उपक्रमामुळे ‘कोल्हापूर’ आदर्श
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर- विविध योजनांची नियोजनबद्ध अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, लोकसहभागातून राबविलेले कायापालट अभियान, बोलक्या शाळांचा उपक्रम, अशा आदर्शवत उपक्रमांमुळे येथील जिल्हा परिषद केंद्र स्तरावर जाऊन पोहोचली आहे. राज्यात प्रथम आल्यानंतर केंद्रातही अव्वल ठरल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषद आदर्श ठरली आहे.
२०१३-१४ मधील कामकाजावर यशवंत पंचायत राज अभियान तथा पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेंतर्गत अत्युत्कृष्ट ठरवीत राज्यात जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयाच्या राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनेंतर्गत ३० लाखांचे बक्षीस मिळविले. राज्य आणि केंद्र पातळीवर अव्वल ठरल्याने जिल्हा परिषदेचे उपक्रम पाहण्यासाठी राज्यातून अधिकारी, पदाधिकारी येत आहेत.
जिल्हा परिषदेने निर्मल भारत अभियानात पहिल्यापासून देशात घेतलेली आघाडी आजही कायम ठेवली आहे. सहा तालुके पूर्णपणे निर्मल झालेला राज्यातील कोल्हापूर हा एकमेव जिल्हा आहे. जिल्ह्यातील तब्बल १००२ गावांनी निर्मलग्राम पुरस्कार मिळविले आहेत. आता जिल्हा देशात निर्मल करण्यासाठी व्यापक नियोजन केले आहे.
आरोग्य विभागाने गेल्या वर्षापासून लोकसहभागातून कायापालट हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला. या उपक्रमातून देणगी व वस्तू स्वरूपात ९१ लाख ३८ हजारांची कामे प्राथमिक आरोग्य केंद्रांत झाली आहेत. परिणामी, आरोग्य केंद्रांचा चेहरामोहरा बदलला. दर्जेदार सेवा-सुविधांमुळे आरोग्य केंद्रांत उपचार घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. राज्यस्तरावर याची नोंद घेण्यात आली. राज्यात सर्व जिल्ह्यांत कायापालट योजना राबविण्यासाठी शासनाने ३ सप्टेंबर २०१४ रोजी शासन निर्णय काढला. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘चिरायू योजना’ व्यापकपणे राबविली. ग्रामीण भागातील खेळाडंूना दर्जेदार शिक्षण व खेळाचे प्रशिक्षण मोफत उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील एकमेव पथदर्शी अशी ‘राजर्षी शाहू छत्रपती निवासी क्रीडा प्रशाला’ सुरू केली. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत ‘कौशल्य विकास व रोजगारनिर्मिती’मध्ये ‘एक कुटुंब, एक नोकरी’ हा उपक्रम राबवून गेल्या वर्षी राज्यात पहिला क्रमांक मिळविला.
बायोगॅस बांधण्यात विक्रम
राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत २०१३-१४ मध्ये राज्यात सर्वाधिक बायोगॅस सयंत्र उभारणी करण्याचा विक्रमही जिल्हा परिषदेने केला आहे. बायोगॅस उभारणीत राज्याच्या एकूण उद्दिष्टाच्या टक्केवारीत २७ टक्के हिस्सा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे.