श्री पैसाफंड बँकेच्या कोल्हापूर, इचलकरंजीत शाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:52+5:302021-09-26T04:26:52+5:30
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या कोल्हापूर व इचलकरंजी शहरांत शाखा सुरू करण्याचा निर्णय ...

श्री पैसाफंड बँकेच्या कोल्हापूर, इचलकरंजीत शाखा
हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या कोल्हापूर व इचलकरंजी शहरांत शाखा सुरू करण्याचा निर्णय बँकेच्या आजच्या ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब भोजे होते.
बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक लोकसेवक आ. बा. नाईक, संस्थापक अध्यक्ष एल. वाय. पाटील व हुपरीभूषण य. रा. नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.
कार्यकारी संचालक शिवराज नाईक म्हणाले, बँकेकडे अहवाल सालात ११२ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, ६३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. अहवाल सालात बँकेला तीन कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला. आवश्यक तरतुदी करून निव्वळ नफा ७५ लाख इतका झाला आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा या उद्देशाने संस्थेने रांगोळी, सांगवडेवाडी व कसबा सांगाव या ठिकाणी नवीन तीन शाखा सुरू केल्याचे सांगितले. बँकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, बँकेची सांपत्तिक स्थिती, सामाजिक कार्य, तसेच बँकेने नुकत्याच नवीन तीन शाखांमार्फत सुरू केलेले कामकाज व सभासदांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये असणाऱ्या निरनिराळ्या सवलती, आदी माहितीचा सविस्तर आढावा कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी यावेळी प्रास्ताविकात घेतला. सभेची नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन व त्यासंबंधाने सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थापक एस. एच. रजपूत, अध्यक्ष आण्णासो भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी समर्पक उतरे दिली. ज्येष्ठ संचालक कल्लाप्पाण्णा गाट यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विलासराव नाईक, प्रकाश जाधव, धनाजीराव भोसले, आनंदराव उलपे, शीतलकुमार पाटील, धनंजय खेमलापुरे, अरुण कांबळे, घनश्याम माळी, बाळासाहेब गाट, पद्मसेन घोरपडे, सुशिला गोंधळी व विजयकुमार पाटील उपस्थित होते.
फोटो २५ हुपरी पैसाफंड
हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री पैसाफंड शेतकी सहकारी बँकेच्या ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आण्णासाहेब भोजे, शामराव गायकवाड, विलासराव नाईक, प्रकाश जाधव, कल्लाप्पाण्णा गाट, आदी उपस्थित होते.