कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचा निधी खड्ड्यांत

By Admin | Updated: December 2, 2014 23:50 IST2014-12-02T23:39:54+5:302014-12-02T23:50:58+5:30

पॅचवर्किंग करूनही खड्डेच खड्डे : लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष, आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा चुराडा

Kolhapur-Gaganbawda road funded in Khaddi | कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचा निधी खड्ड्यांत

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचा निधी खड्ड्यांत

प्रकाश पाटील - कोपार्डे -एखाद्या भागाचा विकास हा त्या भागातील दळणवळण यंत्रणेवर अवलंबून असतो. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा यांच्या अनास्थेमुळे महत्त्वाच्या मार्गांनाही अवकळा आली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणून कोल्हापूर-गगनबावडा या राज्य मार्गाकडे पाहता येईल. फुलेवाडी नाका सोडल्यानंतर गगनबावड्यापर्यंत खड्डे, धूळ व दोन्ही बाजूंनी होणारे अतिक्रमण यात हा राज्यमार्ग गुरफटला आहे. हा मार्ग दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधीचा निधी मुरला आहे. नुकतेच केलेले पॅचवर्कही निघून पुन्हा हा रस्ता खड्डेमय झाला आहे. मग हा दुरुस्तीचा निधी नेमका गेला तरी कुढे ? याचा आढावा घेणारी मालिका आजपासून...
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून इतर कोणत्याही विकासकामांपेक्षा रस्त्यावर आपला निधी खर्च करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, हा निधी मंजूर करून खर्च करताना त्याचा योग्य विनियोग होतोय काय? त्यातून करण्यात येणाऱ्या कामाच्या दर्जाची स्वत:हून कधी पाहणी केली जात नसल्याचे चित्र पाहायला मिळते. यातून ठेकेदार राजकीय यंत्रणा व लोकप्रतिनिधी अशी साखळी तयार होऊन निधी तर खर्च करावयाचा, पण त्याच्या दर्जाबाबत कोणीही गांभीर्याने घ्यावयाचे नाही हे सूत्रच ठरले आहे.
असाच प्रकार कोल्हापूर-गगनबावडा या महत्त्वाच्या आणि निसर्गसंपन्न असलेल्या राज्यमार्गाबाबत पाहायला मिळत आहे. २५० वळणांच्या राज्यमार्गावर गेली अनेक वर्षे कोट्यवधीचा निधी शासन व लोकप्रतिनिधींनी आपल्या वेगवेगळ्या फंडातून खर्च केला आहे. मात्र, हा पैसा काही ठेकेदार व शासकीय यंत्रणेच्या भ्रष्टाचारी कारभाराने वाया जात आहे. त्याशिवाय दररोजच्या प्रवासात वाहनचालक व मोटारसायकलस्वारांना धुळीचा व खड्ड्यांचा सामना करावा लागतो. अनेक जण या खड्यामुळे जायबंदी झालेत तर कांहीना आपला जीवही गमवावा लागला आहे.
फुलेवाडी जकात नाक्यापासून हा राज्यमार्ग सुरू होतो; पण अगदी शहरापासून म्हणजे रंकाळा तलावापासून या मार्गाला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. रंकाळा तलावाजवळ उभ्या राहिलेल्या भव्य मॉलसमोरील रस्ता येथील गाळेधारकांनी हायजॅक केला आहे. दुपदरीकरण झालेले असतानाही डी मार्टसमोरील रस्ता खचल्याने बंद करण्यात आला आहे. याचा वापर येथे खरेदी करण्यासाठी आलेल्या वाहनचालकांसाठी पार्किंगसाठी केला जात असताना प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ट्रॅफिक जॅमला जनतेलाच तोंड द्यावे लागत आहे.
येथून पुढे फुलेवाडी जकात नाका ते सांगरूळ फाटा कोपार्डे (ता. करवीर) इथंपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा टपरीचालक, वीट व्यावसायिक यांनी अतिक्रमण करून रस्ता चिंचोळा केला आहे. या रस्त्यावर सध्या पॅचवर्किंग झाले आहे. मात्र, मोठा खड्ड्यांचे पॅचवर्किंग करीत असनाता छोट्या खड्ड्यांकडे लक्षच दिले गेले नाही. त्याशिवाय या पॅचवर्किंगचे काम एवढे निकृष्ट आहे की, एक महिन्यापूर्वी केलेले पॅचवर्किंगही उखडले गेले आहे.
हा मार्ग रहदारीचा आहे त्यामुळे पाच मीटरचा रस्ता अपुरा पडत असून त्याचे रुंदीकरण होऊन तो १० मीटरचा व्हावा, अशी मागणी होत आहे.



गगनबावडा रस्त्याचे काम कधीही दर्जाला साजेशे झालेले नाही. दोनच महिन्यांपूर्वी कोल्हापूरपासून पॅचवर्किंग चालू आहे. मात्र, आता ते उखडले गेले आहे. यासाठी आमदार व खासदारांनी निवडणुकीत दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे या मार्गाचे चौपदरीकरण करावे.
- सुभाष महादेव पाटील, वाकरे, ता. करवीर



या रस्त्याची एवढी दुरवस्था आहे की, रोज एकतरी अपघात आम्हाला पाहायला मिळतो. पाटील पेट्रोल पंप ते नाका यापर्यंतच्या रस्त्यावर केवळ पाच महिन्यांपूर्वी बी.बी.एम. केले आहे. मात्र, त्यावर कारपेट केले गेलेलेच नाही. त्यामुळे तो पुन्हा उखडला गेला आहे. रस्ता चांगला व रुंदीकरण करून जनतेची रोजच्या कटकटीतून मुक्तता करावी.
- राजू माने, फुलेवाडी नाका, व्यावसायिक

Web Title: Kolhapur-Gaganbawda road funded in Khaddi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.