कोल्हापूर ‘फुल्ल’ रविवार...
By Admin | Updated: October 19, 2015 00:14 IST2015-10-19T00:08:15+5:302015-10-19T00:14:30+5:30
अंबाबाई मंदिरात गर्दीचा कळस

कोल्हापूर ‘फुल्ल’ रविवार...
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने रविवारी कळस गाठला. एका दिवसात २ लाख ८८ हजार ७५० भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते, तर गेल्या सहा दिवसांत गर्दीने १४ लाख ७० हजार ४७८चा आकडा पार केला.दरवर्षी नवरात्रात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या १४ लाखांच्या आसपास असते. यंदा मात्र राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका असल्याने उच्चांकी गर्दी होत आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या गर्दीचा ओघ रविवारी उच्चांकी पातळीवर होता. पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांच्या रांगा मंदिराबाहेर आल्या होत्या. महिला भाविकांच्या चार पदरी रांगा भवानी मंडपापर्यंत आल्या होत्या. पुरुष भाविकांच्या रांगा जोतिबा रोडमार्गे भवानी मंडपात वळवून पुढे भाऊसिंगजी रोडपर्यंत गेली होत्या. दक्षिण दरवाजा येथील मुख्य दर्शनाच्या रांगाही शेतकरी बाजारपर्यंत आल्या होत्या. मंदिरात दत्तमंदिरासमोरील व गरुड मंडपातील मुख्य दर्शनाच्या ठिकाणीही भाविकांचे लोंढेच्या लोंढे होते. मंदिर परिसरात पाय ठेवायलाही जागा नव्हती. रविवारी होणारी गर्दी अपेक्षित ठेवूनच मंदिराकडे जाणाऱ्या सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. मंदिरापासून ते शिवाजी चौक, बिंदू चौक, खरी कॉर्नर, ताराबाई रोड, पापाची तिकटी या सगळ््या मार्गांवर फक्त भाविकांची गर्दीच गर्दी दिसत होती. याशिवय आटपाडी येथून भाविकांच्या ४० बसेस दाखल झाल्या होत्या.
स्वयंसेवींची अमूल्य मदत..भाविकांची ही अलोट गर्दी सावरण्यात पोलिसांना खरी मदत झाली ती स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची. या रांगांचे नियोजन करण्यात अनिरुद्ध उपासना केंद्र, व्हाईट आर्मी, स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले तरुण-तरुणी, जीवन ज्योती संस्थेचे कार्यकर्ते यांनी मोलाची भूमिका बजावली. मुखदर्शनाची रांग, गाभारा दर्शनाची रांग या पाट्याही घेऊन महिला व मुली थांबल्या होत्या. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांच्याकडून तसेच काही संस्थांकडून भाविकांना पिण्याचे पाणी पुरविले जात होते.
भाविकांची गर्दी अशी
दि. १३ : १ लाख ६६ हजार १२७
दि. १४ : २ लाख १२ हजार ४४६
दि. १५ : २ लाख ५० हजार ९५९
दि. १६ : २ लाख ९० हजार ३२०
दि. १७ : २ लाख ६१ हजार ७५०
दि. १८ : २ लाख ८८ हजार ८७६+
उमेदवारांचा प्रचार..
या गर्दीचा लाभ उठवत शहरातील बहुतांशी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात प्रचार मोहीम राबविली होती. त्या-त्या पक्षांचे कार्यकर्ते स्कार्फ-टोप्या घालून भाविकांना केळी, खिचडी, लाडू अशा प्रसादाचे वाटप करत होते.
दोन टप्प्यांत प्रचार...
रखरखत्या उन्हाचा अंदाज घेत उन्हाचा तडाखा वाढण्यापूर्वी सकाळी व ऊन कमी झाल्यानंतर सायंकाळी अशा दोन टप्प्यांत या प्रचारफेऱ्यांचे नियोजन केले होते.
वैयक्तिक गाठीभेटी
रविवारी कुटुंबातील सर्व मतदार भेटणार असल्याने उमेदवारांनी घरोघरी जाऊन गाठीभेटीवर भर दिला, तसेच वॉर्डनिहाय आणि प्रभागनिहाय बैठका घेऊन प्रचाराची आखणी केली. बच्चेकंपनीसह महिलाही प्रचारात सहभागी होत्या.