एमपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा, जिल्ह्यातील १३ जणांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:16 AM2020-06-20T11:16:52+5:302020-06-20T11:52:50+5:30

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बाजी मारली.

Kolhapur flag won in MPSC exam, 13 people from the district won | एमपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा, जिल्ह्यातील १३ जणांनी मारली बाजी

एमपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा, जिल्ह्यातील १३ जणांनी मारली बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देएमपीएससी परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा, जिल्ह्यातील १३ जणांनी मारली बाजी यशस्वितांवर शुभेच्छांचा वर्षाव

 कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या विविध पदांच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी बाजी मारली.

त्यात देवर्डे (ता. आजरा) येथील लक्ष्मण कसेकर, खणदाळ (ता. गडहिंग्लज)मधील अनुप पाटील, पेठवडगावच्या विजय सूर्यवंशी यांनी उपजिल्हाधिकारीपदाच्या, तर करवीर तालुक्यातील शिये येथील विपुल पाटील, पाडळी खुर्दमधील संदीप पाटील यांनी पोलीस उपअधीक्षकपदाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली.

तहसीलदार, नायब तहसीलदार, उपअधीक्षक (उत्पादन शुल्क), औद्योगिक अधिकारी, डेस्क ऑफिसरपदाच्या परीक्षेत एकूण सातजणांनी यश मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांवर नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

विविध ४२० पदांसाठी ह्यएमपीएससीह्णतर्फे जुलै २०१९ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्याचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यात रोहिणी पाटील (सरुड), कौशल्यराणी देसाई (लाटवडे, तहसीलदार), सुनील लोंढे (बामणे), अनिल पाटील ( सरुड, नायब तहसीलदार), प्रवीणकुमार तेली (हनिमनाळ, उपअधीक्षक (उत्पादन शुल्क), मानसी पाटील (शिंगणापूर, औद्योगिक अधिकारी), स्नेहल लाड (उपमुख्य कार्यकारी अधिकारी) यांनी यश मिळविले आहे.

कोल्हापुरात अभ्यास करणाऱ्या तिघांचे यश

कोल्हापुरात अभ्यास करणाऱ्या साखरपा (जि. रत्नागिरी) येथील संकेत कदम (औद्योगिक अधिकारी), उंब्रज (ता. कऱ्हाड)मधील सुशांत साळुंखे (नायब तहसीलदार) आणि साताऱ्यामधील प्रशांत नलवडे (डेस्क ऑफिसर) यांनी यश मिळविले.

विविध क्लासेसचे मार्गदर्शन

या विविध पदांसाठीच्या परीक्षेची यशस्वी उमेदवारांनी विविध खासगी क्लासेसच्या माध्यमातून तयारी केली. त्यामध्ये कोल्हापुरातील स्टडी सर्कल, ए. बी. फाउंडेशन, युनिक अकॅडमी, अरुण नरके फौंडेशन, आदींचा समावेश होता.

पदनिहाय आकडेवारी दृष्टिक्षेपात

  • उपजिल्हाधिकारी : ३
  • पोलीस उपअधीक्षक : ३
  • तहसीलदार : २
  • उपमुख्य कार्यकारी अधिकारी : १
  • नायब तहसीलदार : २
  • उपअधीक्षक (उत्पादन शुल्क) : १
  • औद्योगिक अधिकारी : १
     

ब्रेन हॅमरेज होऊनही सुनील लोंढे बनले नायब तहसीलदार

ब्रेन हॅमरेज, व्हिजन लॉस या शारीरिक अडचणींवर मात करीत डॉ. सुनील माधव लोंढे यांनी नायब तहसीलदारपदाला गवसणी घातली. बामणे (ता. भुदरगड) येथील लोंढे यांचे प्राथमिक शिक्षण गावात, तर ‘बीएएमएस’चे शिक्षण मुंबईत झाले. त्यानंतर डॉक्टर म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यातच सन २०१४ मध्ये त्यांच्या अनिल या धाकट्या भावाचा अपघाती मृत्यू झाला. या धक्क्याने सुनील यांचे ब्रेन हॅमरेज आणि पुढे त्यांचे व्हिजन लॉस झाले. त्यांना कमी दिसू लागले. त्यावर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय करणे थांबविले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. जिद्द, कष्ट आणि अभ्यासाच्या बळावर त्यांनी नायब तहसीलदारपदाला (६६ वी रँक) गवसणी घातली. आजपर्यंत केलेल्या कष्टांचे फळ मिळाले. माझ्या यशात कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. यूपीएससी करण्याचे माझे ध्येय असल्याचे सुनील यांनी सांगितले.

नोकरी करीत प्रवीणकुमार यांनी मिळविले यश

करनिरीक्षक पदावर काम करीत प्रवीणकुमार जयसिंग तेली (हनिमनाळ, ता. गडहिंग्लज) यांनी उपअधीक्षक (उत्पादन शुल्क) पदाच्या परीक्षेत यश मिळविले. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावात, तर माध्यमिक शिक्षण गडहिंग्लजमध्ये झाले. ज्युनिअर महाविद्यालयीन शिक्षण एम. आर. काॅलेजमध्ये आणि जे. जे. मगदूम इंजीनिअरिंग काॅलेजमधून त्यांनी बी.ई. मेकॅनिकलची पदवी त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. त्यात सन २०१३ मध्ये त्यांनी राज्य कर निरीक्षकपदाच्या परीक्षेत बाजी मारली. या पदावर ते रुजू झाले. सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर यश मिळविल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शिंगणापूर (ता. करवीर) येथील शेतकरी कुटुंबातील मानसी सुभाष पाटील यांनी औद्योगिक अधिकारीपदाच्या परीक्षेत बाजी मारली. त्यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र हायस्कूलमध्ये, तर अभियांत्रिकीचे शिक्षण हे संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधून झाले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सन २०१६ पासून सुरू केला. अभ्यासातील सातत्य आणि कुटुंबीयांच्या पाठबळावर यश मिळविता आल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Kolhapur flag won in MPSC exam, 13 people from the district won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.