महोत्सवासाठी कोल्हापूरचा चित्रपट सज्ज

By Admin | Updated: June 29, 2015 00:47 IST2015-06-29T00:46:48+5:302015-06-29T00:47:00+5:30

आॅक्टोबरमध्ये प्रदर्शित : ‘इमेगो’चे पोस्ट प्रॉडक्शन सुरू; पन्हाळा, कोल्हापुरात चित्रीकरण

Kolhapur film ready for the festival | महोत्सवासाठी कोल्हापूरचा चित्रपट सज्ज

महोत्सवासाठी कोल्हापूरचा चित्रपट सज्ज

संदीप आडनाईक -कोल्हापूर -फाईन आर्टस्ची पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापुरातील लघुपटकर्त्या तरुण मंडळींची निर्मिती असलेला ‘इमेगो’ हा नवा पूर्ण लांबीचा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पन्हाळा आणि कोल्हापूर येथे पार पडले. आॅक्टोबरपर्यंत या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण होईल, अशी माहिती या चित्रपटाचे दिग्दर्शक करण चव्हाण यांनी दिली.
करण चव्हाण आणि विक्रम पाटील हे दळवीज आर्टस् इन्स्टिट्यूटचे फाईन आर्टसचे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासोबत असलेले कलामंदिर महाविद्यालयाचे रावसाहेब चिखलवाळे, कलानिकेतन महाविद्यालयाचे विकास डिगे यांनी यापूर्वी एकत्रितपणे काम केले आहे. यापूर्वी या टीमने दगडफूल, पोल्यूट, म्यूट, अलोन यासारख्या प्रत्ययकारी दृश्यभाषा असलेल्या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटांना विविध महोत्सवात पुरस्कारही मिळालेले आहेत. आता त्यांनी पूर्ण लांबीच्या चित्रपट निर्मितीत झेप घेतली आहे.
आंतरिक सुंदरतेची जाणीव असे आशयसूत्र असलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटात व्हिटिलिगो (श्वेत) या त्वचारोगाने त्रस्त असलेल्या युवतीची मानसिक स्थित्यंतरे दाखविली आहेत. नववास्तववादी शैलीतील या चित्रपटामध्ये जीवन हे आहे तसे स्वीकारले पाहिजे हा विचार मांडलेला आहे. त्यानुसारच अभिनय शैली, दृश्यभाषा, सिंकध्वनी अशी योजना चित्रीकरणात स्वीकारली आहे.

हा एक कलात्मक चित्रपट असून त्याची तुलना फॅन्ड्री आणि कोर्ट या चित्रपटाशी करता येईल. कोल्हापूरातील तसेच मुंबईतील नवकलाकारांनी यात काम केले आहे. या चित्रपटासाठी अभिनयाशी संबंधित एकही कलाकार नाही. प्रत्यक्ष जीवनातील व्यक्तींनी यात अभिनय केला आहे.
-करण चव्हाण,
दिग्दर्शक, इमेगो.

या कलात्मक चित्रपटाची निर्मिती राजेंद्र यादव यांनी अविराज फिल्म्स एंटरटेन्मेंट या निर्मिती संस्थेमार्फत केली आहे.
करण चव्हाण आणि विक्रम पाटील या युवकांनी या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे.
रावसाहेब चिखलवाळे, विकास डिगे यांनी प्रॉडक्शन डिझाईनचा विभाग सांभाळला आहे.
रावसाहेब हे पुण्याच्या फिल्म अ‍ॅड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे विद्यार्थी असून त्यांनी प्रॉडक्शन डिझाईनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी फ्रान्स येथील ला फेमिस या प्रतिष्ठित फिल्म इन्स्टिट्यूटमधून चित्रपटविषयक शिक्षण पूर्ण केले.
‘एफटीआयआय’मधील राकेश भिलारे (सहायक छायाचित्रण) राज जाधव (ध्वनी), दर्पण चावला (वेशभूषा), शैलेश कांबळे (रंगभूषा) यांनीही या चित्रपटासाठी तांत्रिक सहकार्य केलेले आहे.
या तरुणांना चित्रपट समीक्षक
डॉ. अनमोल कोठडिया यांनी मार्गदर्शन केले आहे.

Web Title: Kolhapur film ready for the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.