कोल्हापूर-- कांदा दर पडल्याने शेतकरी आक्रमक
By Admin | Updated: September 2, 2014 00:10 IST2014-09-02T00:05:29+5:302014-09-02T00:10:05+5:30
बाजार समितीमधील सौदे पाडले बंद : व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांवर अरेरावी

कोल्हापूर-- कांदा दर पडल्याने शेतकरी आक्रमक
कोल्हापूर : कांद्याचे दर पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज, सोमवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सौदे बंद पाडले. इतर मार्केटप्रमाणे दर देण्याची मागणी करीत भरपावसात सौदा मार्केटमध्येच शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. सौदे बंद केल्यानंतर एका व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना अरेरावीची भाषा वापरल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
बाजार समितीत सध्या जुन्या-नव्या कांद्यांची आवक सुरू आहे. आज २३ गाड्यांची आवक झाली आहे. सकाळी अकरा वाजता कांदा सौदे सुरू झाले. अठरा रुपयांवर दर जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. समितीचे सचिव संपतराव पाटील, सहायक सचिव मोहन सालपे यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण इतर मार्केटप्रमाणे दर मिळाला पाहिजे, या मागणीवर शेतकरी ठाम राहिले. नागपूर, भिवंडी मार्केटमध्ये २२ रुपये किलोने कांदा आहे, मग येथे कमी का? अशी विचारणा करत शुक्रवारी १४ रुपयांनी विकलेला कांद्याचा साडेसहा रुपये दर काढता ही मनमानी चालणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. ही बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची आहे, अशी विचारणा करीत एक व्यापारी शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर जाण्यास सांगतो. ही मग्रूरी खपवून घेणार नाही. एका बाजूने दर पाडून शेतकऱ्यांना लुटायचे आणि दुसरीकडे त्यांच्यावरच अरेरावी करायची, हाच काय तुमचा कारभार? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी समिती प्रशासनाला केला. संबंधित व्यापाऱ्याने माफी मागितल्याशिवाय सौदे सुरू होणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. अखेर दुपारी अडीच वाजता समिती प्रशासनाने शेतकरी व व्यापाऱ्यांबरोबर बैठक घेऊन वादावर तोडगा काढला. दुपारी तीननंतर सौदे पूर्ववत सुरू झाले. (प्रतिनिधी)
लायसन्स रद्द करा
व्यापाऱ्यांना कांदा परवडत नसेल, तर बाजार समितीने मार्केट बंद करीत असल्याचे सांगावे. शेतकरी पर्याय बघेल. दोनशे किलोमीटरवरून येऊन अपमान करता. शेतकऱ्यांवर अरेरावी करणाऱ्या व्यापाऱ्यांची लायसन्स रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
वरातीमागून घोडे
तीन तास सौदे ठप्प झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. अशा वेळी तातडीने प्रशासक मंडळाने हस्तक्षेप करून तोडगा काढणे गरजेचे होते; पण दुपारी दोनपर्यंत इकडे अशासकीय प्रशासक मंडळातील एकही सदस्य फिरकला नाही. दोननंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष समितीत आले.
व्यापारी जाणीवपूर्वक दर पाडतात. सांगली मार्केटमध्ये २३ रुपये दर चालू असताना येथे १७ रुपयांच्यावर दर जात नाही. उलट आम्हालाच अरेरावीची भाषा वापरली जाते आणि बाजार समिती मूग गिळून गप्प बसते, हे योग्य नाही. - संतोष तोडकर, शेतकरी, श्रीगोंदा