कोल्हापूर- ई-प्रचाराचा ‘फड’ जोरात
By Admin | Updated: October 5, 2014 23:06 IST2014-10-05T22:52:28+5:302014-10-05T23:06:01+5:30
घोषवाक्यांची ‘टर’: उणी-दुणी काढणे, व्यंगात्मक प्रचाराला वेग

कोल्हापूर- ई-प्रचाराचा ‘फड’ जोरात
संतोष पाटील -कोल्हापूर- सर्वच पक्षांसह उमेदवारांनी वैयक्तिक घोषवाक्ये प्रचारात आणली आहेत. त्यातूनच ‘व्हॉटस् अॅप’ व ‘फेसबुक’वर एकमेकांची ‘टर’ उडविणारी पोस्टरबाजी रंगली. सोशल मीडियातील या फुकटच्या ई-प्रचाराचा फड सध्या जोरात रंगला. कोणाचेही बंधन व आडकाठी नसलेला ‘सोशल’ प्रचारास एरव्ही निवडणुकीच्या प्रचाराकडे कधीही न पाहणाऱ्या वर्गाकडूनही दाद मिळत आहे.
आचारसंहितेमुळे निवडणूक खर्चावर बंधने आली. त्यामुळे अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार उमेदवार घेताना दिसत आहेत. महिन्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्टला सहा-सहा महिने उत्तर न देणारे व्हॉटस् अॅपवर क्षणात थम्ब देऊन दाद देत आहेत. फेसबुक व व्हॉटस् अॅप ही वापरण्यासाठी व फोटो अपलोड करून मतदारांचा कानोसा घेण्यासाठी फुकटच्या माध्यमांची सध्या जोरात चलती आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या व भाषणाच्या क्लीप क्षणात कार्यकर्त्यांमार्फत पोहोच केल्या जात आहेत. बल्क मेसेज किंवा आक्षेपार्ह मजकूर वगळता निवडणूक आयोगाचे सोशल मीडियाकडे लक्ष नाही. त्यामुळेच निवडणूक खर्चांपासून चार हात दूर राहात घराघरांत पोहोचण्याचा फंडा सुरू आहे.
फेसबुक पेज व व्हॉटस् अॅपच्या गु्रपमध्ये उमेदवारांच्या घुसखोरीचे प्रमाणही वाढले आहे. एकमेकांच्या ग्रुपमध्ये लक्ष ठेवून आक्षेपार्ह किंवा विनोदी अंगाने आलेल्या मेसेजला ‘जशास तसे’ उत्तर देणारी मेसेजही फिरत आहेत. पेजवरील घुसखोरी रोखण्यासाठी व ‘वॉच’ ठेवण्यासाठी आयटी तज्ज्ञांचे पथकच उमेदवारांनी पदरी बाळगले आहे.
सोशल मीडियावरील फोटो व व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद उमेदवार जातीनिशी तपासत आहेत. कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया व सूचनांची तत्काळ दखलही घेतली जात आहे. पेज व फेसबुकवरील मिळणाऱ्या लाईकची दर तासाला मोजणी करून याची माहिती उमेदवारांना दिली जाते.
नेत्यांची वाक्ये किंवा जाहिरातीतील मजकूर घेऊन त्याची टर उडविण्याचा उद्योग सध्या जोरात सुरू आहे. ‘काय करून ठेवलंय माझ्या महाराष्ट्राचं’ हा मेसेज सर्वांत लोकप्रिय ठरत आहे. कल्पकता पणाला लावून यमक जुळवत विनोदी अंगाने लिहिलेले मेसेज् व्हॉटस् अॅपवर भराभर फिरत आहेत. ‘असे मेसेज पाठवू नका, आपण सृजन मतदार आहात’ असा संदेश देणाऱ्या मेसेज्ची संख्याही वाढत आहे.
व्यंगात्मक प्रमाण वाढले
पक्षप्रमुखांच्या फोटोखाली दुसऱ्याच उमेदवाराच्या प्रचारार्थ ओळी, तर राष्ट्रीय नेत्यांचा आशीर्वाद दिल्याचे रचनात्मक फोटो सोशल मीडियात फिरत आहेत. एकामेकांचे व्यंग करणारे फोटो, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या स्लोगनला तितक्याच ताकदीने उत्तर देण्यासाठी हजरजबाबी, चुटके व कोट्या करणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे.