कोल्हापूर डॉल्बीचाच दणदणाट !

By Admin | Updated: September 11, 2014 00:13 IST2014-09-10T00:52:26+5:302014-09-11T00:13:38+5:30

पायंडा मोडला : २८ तासांच्या मिरवणुकीनंतर बाप्पाला निरोप

Kolhapur dolbicha balloon! | कोल्हापूर डॉल्बीचाच दणदणाट !

कोल्हापूर डॉल्बीचाच दणदणाट !

कोल्हापूर : विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांशी कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतल्याने विसर्जन मिरवणूक रेंगाळली. काल, सोमवारी सकाळी ८.४० वाजता सुरू झालेली मिरवणूक मंगळवारी दुपारी १२.४० पर्यंत तब्बल अठ्ठावीस तास सुरू राहिली. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही; परंतु गेल्या दोन वर्षांत डॉल्बीला फाटा देऊन चांगला पायंडा सुरू झाला होता, तो यंदा मोडला व दिवसरात्र मिरवणूक मार्गावर कानठळ्या बसणाऱ्या डॉल्बीचाच दणदणाट सुरू राहिला.
मोठ्या मंडळांनी दादागिरी केल्याने मिरवणूक मुंगीच्या पावलांनी पुढे सरकली. आकर्षक रोषणाई व शार्पीच्या प्रखर झोतांमुळे डोळे दिपून गेले. ‘मोरया... मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा घोषणा देत अपूर्व जल्लोषात दाटलेल्या भावनांनी जनसमुदायाने बाप्पांना निरोप दिला.
किरकोळ वादावादी वगळता कोल्हापूरसह जिल्ह्यात मिरवणूक जल्लोषात पार पडली. इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, राधानगरी, गारगोटी, मलकापूर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, आदींसह ग्रामीण भागातही मिरवणुकीत आनंदाचे भरते आले. कोल्हापूरची पहिल्या मानाच्या गणपतीची परंपरा तुकाराम माळी तालीम मंडळाने यंदाही जपली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील, महापौर तृप्ती माळवी, जिल्हाधिकारी राजाराम माने व जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. चेतना मतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते पालखी उचलली.
या मंडळाच्या पालखीतून आणलेल्या मिरवणुकीने विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झाली. या मंडळाने यंदा आपली मूर्ती दान करून विसर्जनाचा पर्यावरणपूर्वक पायंडा पाडला. मात्र, बहुतांश मंडळांनी गेली दोन वर्षे सुरू असलेला डॉल्बीमुक्त मिरवणुकीचा पायंडा यंदा फाट्यावर बसविला. डॉल्बीचा त्रास नागरिक व पोलिसांनाही झाला. त्यावर उपाय म्हणून त्यांनी कानांत कापसाचे बोळे घातले; परंतु डॉल्बी व डोळे दिपवून टाकणारी रोषणाई मात्र सुरूच राहिली.
निषेध असाही...
डॉल्बीच्या विरोधात मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी व पोलीस प्रमुख असे कुणीच बोलायला तयार नसताना उद्योजक राजू जाधव यांनी मात्र त्यास उघडपणे विरोध केला. जाधव यांच्या कोष्टी गल्लीतील श्री तरुण मंडळाची मिरवणूक नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यांनी यंदाही त्यांनी कुके सुब्रह्मण्यम नाग गणेशाचा देखणा रथ रविवारीच तयार केला होता. परंतु त्याला मिरवणूक मार्गावर तिष्ठत थांबावे लागले. सोमवारी सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीत सहभागी झालेला हा रथ मंगळवारी सात वाजता पापाच्या तिकटीला आला. जाधव यांनी महापालिका प्रशासनासह कोणत्याच संस्था-संघटनेचा मानाचा नारळ न स्वीकारता डॉल्बीचा वेगळ्या पद्धतीने निषेध केला.

असे झाले विसर्जन..
कोल्हापूर शहर - १५०० इचलकरंजी - ४५०
कोल्हापूर जिल्हा (एकत्रित) - ३५००
सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती दान
पंचगंगा नदीवर - ८०
राजाराम तलावावर - ३४

Web Title: Kolhapur dolbicha balloon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.