कोल्हापूरच विभागाची तिन्ही गटात आगेकूच
By Admin | Updated: September 26, 2015 00:19 IST2015-09-26T00:03:27+5:302015-09-26T00:19:56+5:30
फुटबॉल : राज्यस्तरीय शालेय स्पर्धेस शानदार प्रारंभ, २४ संघांचा सहभाग

कोल्हापूरच विभागाची तिन्ही गटात आगेकूच
कोल्हापूर : क्रीडा व युवक संचालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेच्या शुक्रवारी पहिल्या दिवशी कोल्हापूर विभागाच्या १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत पुढील फेरी गाठली. कोल्हापूरचे तिन्ही संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे शुक्रवारी सकाळी उद्घाटनाच्या सामन्यात कोल्हापूर विभाग संघ विरुद्ध लातूर विभाग संघ यांचा सामना झाला. हा सामना कोल्हापूर विभागाने ट्रायबे्रकरवर ४-२ असा जिंकला; तर दुसऱ्या सामन्यात पुणे विभागाने नाशिक विभागावर ५-० अशी एकतर्फी मात केली. पुणेकडून गोल्ड रणदिवे याने दोन, तर ऐमर अॅडम, फ्रँकलिन नागरथ, करण मोडक यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवीत विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यात औरंगाबाद विभागाने मुंबई विभागाचा ४-३ असा टायबे्रकरवर पराभव केला; तर चौथ्या सामन्यात नागपूर विभागाने अमरावती विभागावर ३-१ अशी मात केली. नागपूरकडून बादल सोरेन, सईद अन्वर, अल्लसा उदीन यांनी प्रत्येकी एक, तर अमरावतीकडून पवन सकपाळेने एकाकी झुंज देत एक गोल नोंदवीत पुढील फेरीत प्रवेश केला.
विभागीय क्रीडासंकुलात झालेल्या १७ वर्षांखालील गटात पहिला सामना अमरावती विभागाने लातूर विभागाचा ८-० असा एकतर्फी धुव्वा उडविला. अमरावतीकडून जव्वाद शेखने ४, शंतनू भोवळेने २, तर गौरव जोंधळे व संकेत टोटेवार यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात मुंबई विभागाने नागपूर विभागाचा ४-१ असा पराभव केला. या सामन्यात मुंबईकडून प्रथमेश बामणेने दोन, तर रोहित शेट्टी, अंकित सक्सेना यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. तिसऱ्या सामन्यात कोल्हापूर संघाने पुणे विभागाचा ५-२ असा टायबे्रकरवर पराभव केला. कोल्हापूरकडून तेजराज अपराध, तर पुणेकडून निखिल पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.
छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या १९ वर्षांखालील गटात मुंबई विभागाने औरंगाबाद विभागाचा ५-० असा धुव्वा उडविला. मुंबईकडून आशिष हलगे व साऊद शेख यांनी प्रत्येकी दोन, तर अमित चितगड्डे यांनी एक गोल केला. दुसऱ्या सामन्यात नाशिक विभागाने पुणे विभागाचा ४-१ असा टायब्रेकरवर पराभव केला. तिसऱ्या सामन्यात नागपूर विभागाने अमरावती विभागाचा ३-० असा एकतर्फी पराभव केला. नागपूरकडून रोहित कनोजियाने दोन, तर मिहीर नाईक याने एक गोल नोंदविला. चौथ्या सामन्यात यजमान कोल्हापूर विभागाने लातूर विभागाचा ७-० असा धुव्वा उडविला. कोल्हापूरकडून संदीप गोंधळीने ३, तर शाहू भोईटे, अनिकेत जोशी, प्रथमेश हेरेकर, पवन सरनाईक यांनी प्रत्येकी एक गोल करीत आगेकूच केली. या विजयामुळे कोल्हापूर संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. (प्रतिनिधी)
श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते उदघाटन
स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते ध्वजवंदनाने झाले. यावेळी अध्यक्षस्थानी क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त राजाराम माने यांच्यासह महापौर वैशाली डकरे, आमदार चंद्रदीप नरके, क्रीडा उपसंचालक एन. बी. मोटे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवाजी पाटील, आर. डी. पाटील, ‘प्रिन्स शिवाजी’चे संचालक विनय पाटील, आदी उपस्थित होते.